केंद्रात आणि राज्यात भाजप सत्तेत आल्याबरोबर संघ परिवारातील संघटनांनी अगदी तालुका व गावपातळीवर हिंदू संमेलने घेण्याचा सपाटा सुरू केला आहे. गेल्या दोन महिन्यांत राज्यात सत्तर संमेलने झाली असून येत्या वर्षभरात आणखी संमेलने घेण्याची तयारी या परिवारातील पदाधिकाऱ्यांनी चालवली आहे.
 विश्व हिंदू परिषदेला ५० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने ही संमेलने आयोजित केली जात आहेत, असे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात सत्तेचा फायदा घेत धर्म जागरणाचा अजेंडा या माध्यमातून राबवला जात असल्याचे ठिकठिकाणच्या आयोजनातून दिसून आले आहे. गेल्या १५ वर्षांत विदर्भात केवळ तीन हिंदू संमेलने झाली. भाजप त्या वेळी सत्तेत नव्हता. आता सत्तेत आल्याबरोबर गेल्या दोन महिन्यांत विदर्भात १३ संमेलने आयोजित करण्यात आली. प्रामुख्याने जिल्ह्य़ांच्या ठिकाणी झालेल्या या संमेलनांना भाजपच्या मंत्र्यांनी हजेरी लावावी, असेही संघवर्तुळातून सुचवण्यात आले आहे. शिवाय स्थानिक आमदार, पदाधिकारी यांनीही संमेलनासाठी झटावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
 या प्रत्येक संमेलनाला विश्व हिंदू परिषदेचे सक्रिय पदाधिकारी उपस्थित राहत आहेत. पहिल्या टप्प्यात जिल्हानिहाय व दुसऱ्या टप्प्यात तालुकानिहाय संमेलने आयोजित केली जाणार आहेत. या संमेलनात होणारी भाषणे प्रक्षोभक स्वरूपाची असतात. त्यामुळे त्यावर प्रतिक्रियासुद्धा उमटू लागल्या आहेत.

‘संमेलनांचा कार्यक्रम सत्तेत येण्याआधीचाच’
या संदर्भात विहिंप प्रदेश पदाधिकारी हेमंत जांभेकर यांच्याशी संपर्क साधला असता भाजप सत्तेत येण्याआधीच संघटनेने या संमेलनांचा कार्यक्रम निश्चित केला होता, असा दावा त्यांनी केला. पहिल्या टप्प्यात देशभरात ८५० संमेलने आयोजित केली जाणार आहेत. त्यानंतर दुसरा टप्पा सुरू होईल, असे ते म्हणाले. राज्यात आणखी ६० संमेलने होणार आहेत. संमेलनाला केवळ भाजपच नाही, तर कोणत्याही पक्षातील हिंदू येऊ शकतो. आम्ही कुणाला मज्जाव केलेला नाही, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.