रायगड जिल्ह्यातील महाड शहरात पाच मजली इमारत निवासी इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे जमीनदोस्त झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली तब्बल ७० ते ८० नागरिक अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनानं मदत कार्य सुरू केलं असून, २५ जखमींना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलं आहे. यातील एकाचा मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनानं म्हटलं आहे. दरम्यान, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची तीन पथके पुण्याहून महाडकडे रवाना झाली आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, “काजळपुरा भागातील ‘तारीक गार्डन’ नावाची इमारत कोसळली असून या इमारतीत सुमारे ४७ फ्लॅट होते. त्यातील सुमारे ८० रहिवासी ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, २५ जखमींना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले असून उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ” मदतीसाठी महाड विभागातील सर्व पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून इमारतीचा ढिगारा उपसण्यात येत आहे. मानगांव विभाग, श्रीवर्धन विभाग येथून अतिरिक्त कुमकही बोलावण्यात आली आहे.

या घटनेची माहिती मिळताच महाडचे आमदार भरत गोगावले, माजी आमदार माणिक जगताप, नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी देखील प्रशासनाशी संपर्क साधून या दुर्घटनेची माहिती घेतली.

मुख्यमंत्र्यांची आमदार, जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

या दुर्घटनेची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार भरत गोगावले आणि रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्यासोबत चर्चा केली. तसेच या ठिकाणी जलदगतीने बचावकार्य आणि मदतकार्यासाठी शासनातर्फे सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील महाडच्या दुर्घटनेची माहिती घेतली. तसेच एनडीआरएफच्या महासंचालकांना या दुर्घटनेतील पीडितांना सर्वतोपरी मदत पुरवण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार, एनडीआरएफची पथकं मदतकार्यासाठी रवाना झाली असून लवकरात लवकर ते मदत पुरवतील, अशी माहिती शाह यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

डॉक्टर्स आणि रक्त पिशव्या रवाना

दुर्घटनेनंतर माणगाव, रोहा, अलिबाग येथून डॉक्टरांची पथके आणि रुग्णवाहिका महाडला रवाना करण्यात आल्या आहेत. घटनास्थळावर पाच डॉक्टरांचे पथकही तैनात ठेवण्यात आले आहे. जखमींना रक्ताची गरज लागण्याची शक्यता लक्षात घेऊन पुरेसा रक्तसाठा महाड, माणगाव रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिल्ह्यातील विवीध भागातून रुग्णवाहिका महाडला पाठविण्यात आल्या आहेत.

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकांसाठी ग्रीन कॉरिडॉर

पुण्याहून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची तीन पथके महाडच्या दिशेने रवाना करण्यात आली आहे. ही पथके खोपोलीपर्यंत दाखल झाली असून लवकरच महाडला पोहोचावीत यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला आहे. पथकांसाठी पोलीस दल रस्ता मोकळा ठेवणार आहेत.

विकासकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

साधारणपणे पाच वर्षांपूर्वी तळोजा येथील पटेल आणि युनूस शेख या बिल्डर्सनी या पाच मजली इमारतीचे बांधकाम केले आहे. या इमारतीमध्ये सुमारे सत्तेचाळीस फ्लॅट असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही इमारत हेलकावे खात असल्याची तक्रार रहिवाशांनी या विकासकाकडे केली होती. मात्र, या तक्रारींकडे त्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या विकासकावर त्वरीत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.