अभिनेते शरद पोंक्षे यांच्या कारच्या काचा फोडल्याची घटना अहमदनगरमध्ये घडली आहे. काही अज्ञातांनी अहमनगरमध्ये शरद पोंक्षे यांच्या कारवर हल्ला केला. काचा फोडल्या आणि तिथून पसार झाले. या हल्ल्याच्या वेळी शरद पोंक्षे कारमध्ये नव्हते. त्यामुळे कुणालाही इजा झाली नाही. अहमदनगरमध्ये १०० वी अखिल भारतीय नाट्य परिषद होणार आहे. त्यासंदर्भातली माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कार जिथे पार्क करण्यात आली तिथे कारवर दगडफेक करण्यात आली आहे. काही तरुणांनी दगड फेकून कारच्या काचा फोडल्या अशी माहिती समोर आली आहे. मात्र यामागचं कारण समजू शकलेलं नाही. एका मराठी वृत्तवाहिनीने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

“वीर सावरकर यांचं काम महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यापेक्षा सरस आहे” असं वक्तव्य शरद पोंक्षे यांनी केलं होतं. त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला. शरद पोंक्षे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान झाल्याची भावना बहुजन समाजात होती. त्यातून सोशल मीडियावर पोंक्षे यांच्याविरोधातला रागही व्यक्त झाला. त्याच रागातून कदाचित त्यांच्या कारच्या काचा फोडल्या गेल्या असाव्यात असा प्राथमिक अंदाज व्यक्त होतो आहे.