गोपीनाथ मुंडे यांच्या पश्चात आमदार पंकजा पालवे याच आता राज्यातील उपेक्षित समाजाच्या आधार बनल्या आहेत. मात्र, त्यांच्या सुरक्षेबाबत सर्वसामान्यांच्या मनात प्रश्नचिन्ह आहे. दिवंगत मुंडे यांचा वारसा चालविणाऱ्या पंकजा यांना हितशत्रू लोकांकडून धोका होऊ शकतो. महायुतीच्या प्रमुख नेत्या असल्याने त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे. त्यामुळे त्यांना १४ जुलपर्यंत झेड सुरक्षा द्यावी, अन्यथा गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले जाईल, असा इशारा बहुजन विकास मोर्चाचे प्रमुख बाबुराव पोटभरे यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत दिला. आमदार पालवे यांना झेड सुरक्षा देण्याची मागणी गृहमंत्री पाटील यांची भेट घेऊन केली होती. त्यावेळी पाटील यांनी पोलीस महासंचालकांना तत्काळ कार्यवाही करण्यास सांगितले होते. मात्र, त्यानंतर काहीच कार्यवाही झाली नाही, असे पोटभरे यांनी म्हटले आहे.