राज्यात भाजप-सेनेच्या संसाराला साडेतीन वर्ष झाली तरी विकासाचा पाळणा हलला नाही, अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सरकारला लक्ष्य केले. आघाडी सरकारने केलेल्या चुका आम्ही निस्तरत आहोत, असे फडणवीस सरकारचे म्हणणे आहे. मात्र, हाच धोशा लावून आणखी किती दिवस काम करत राहणार, आधीच्या सत्ताधाऱ्यांना आणखी किती दिवस दोष देणार, याचे आत्मपरीक्षण सरकारने करण्याची गरज आहे.

शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हल्लाबोल आंदोलन सुरु केले. जोपर्यंत समाजातील वेगवेगळया घटकांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत सरकार विरोधातील हा एल्गार असाच सुरु ठेवणार असल्याचा इशारा अजित पवार यांनी दिला. ते गुरुवारी बीड जिल्हयातील गेवराई तालुक्यातील सभेत बोलत होते.

‘कुठे घेवून चाललाय महाराष्ट्र माझा?’; अजित पवारांचा सवाल

देशाची वाटचाल अराजकतेकडे सुरू आहे. आणीबाणीची परिस्थिती येईल की काय?, अशी भीती जनतेमध्ये निर्माण झाली आहे. या सरकारला मराठवाडयाबद्दल आस्थाच राहिलेली नाही असाही आरोप अजित पवार यांनी केला .या बीड जिल्हयाने परळी वगळता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगली साथ दिली असून सध्या महाराष्ट्रातील हवा बदलत आहे. लोक उत्स्फुर्तपणे बाहेर पडत आहेत. सुरुवातीला मोदी तरुणांसाठी काही करतील वाटलं होतं, परंतु आता तरुणांना यातील फोलपणा कळला आहे. त्यामुळे तरूण पेटून रस्त्यावर उतरत आहेत, असे अजित पवार यांनी सांगितले.

सरकारच्या भरवशावर राहू नका: एकनाथ खडसे