21 January 2021

News Flash

मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्येच

महामंडळाच्या घटनेला तिलांजली दिल्याचा पदाधिकाऱ्यांचा आरोप

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे नाशिकमध्येच घेण्याचा निर्णय झाला आहे, असे महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी शुक्रवारी येथे जाहीर केले. मात्र, नाशिकच्या संमेलनस्थळावर शिक्कामोर्तब करताना महामंडळाच्या घटनेलाच तिलांजली देण्यात आली आहे, असा आरोप काही पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

नाशिक की दिल्ली, या दोन स्थळावरून ३ जानेवारीच्या बैठकीतही खडाजंगी झालेली असून महामंडळातही दोन गट असल्याचे अधोरेखित झाले आहे. मात्र नाशिकबाबतचा निर्णय हा महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या संमतीनेच घेण्यात आल्यामुळे घटनेतील नियमाला फाटा वगैरे असे काही म्हणता येणार नाही, अशी भूमिका ठाले पाटील यांनी मांडली.
गतवर्षी उस्मानाबादेत झालेल्या ९३ व्या अ. भा. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर सांस्कृतिकमंत्री अमित देशमुख यांना प्रेक्षकांमध्ये बसवण्यात आले होते. संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय व्यक्तीला बसवले तर त्यांच्याच विधानाला प्रसिद्धी मिळते. त्यामुळे राजकीय व्यक्तीला संमेलनाच्या मंचावर स्थान नको, अशी भूमिका महामंडळाने घेतली आहे.

उस्मानाबादेत त्याचे पालन करण्यात आले होते. मात्र, नाशिकमधील संमेलनाच्या व्यासपीठावर शरद पवार यांना स्थान देणार की त्यांना प्रेक्षकांमध्ये बसवणार, असा प्रश्न ठाले पाटील यांना करताच त्यांनी त्याबाबतचे थेट आणि स्पष्ट उत्तर न देता, यापूर्वी आळंदीच्या संमेलनात शरद पवार, गोपीनाथ मुंडे व अन्य एका संमेलनात विलासराव देशमुख हे प्रेक्षकांमध्ये बसल्याची आठवण सांगितली. नेते खाली बसतात. केवळ सुशीलकुमार शिंदे यांनी कुरकुर केली होती, असे ठाले पाटील म्हणाले. ‘नेत्यांना व्यासपीठावर स्थान नको, अशी महामंडळाची भूमिका आजही आहे. मात्र, ऐनवेळी काय होते ते पाहू,’ असे उत्तर ठाले पाटील यांनी दिले.

…तर दिल्लीत विशेष संमेलन

दिल्लीत संमेलन घेण्याचा प्रस्ताव ‘सरहद’ या संस्थेकडून आलेला आहे. मात्र, दिल्लीतील करोनास्थितीचा विचार केला असता तेथे संमेलन घेणे अडचणीचे ठरणार असल्याचे ठाले पाटील यांनी सांगितले. दिल्लीत संमेलन भरवण्यासाठी फारच आग्रह होत असेल तर तेथे एक विशेष संमेलन घेण्याचा विचार करू, असेही ते म्हणाले.दिल्लीचा आग्रह धरून बसणारे मोदी व गडकरींच्या जवळचे आहेत’’, असा उल्लेख माझ्या नावाने माध्यमांमध्ये आला. त्यामुळे कुणाला विपरीत वाटण्याची शक्यता गृहीत धरून मी दिलगिरी व्यक्त करीत असल्याचे ते म्हणाले.

पुढील वर्षी विदर्भात संमेलन

पुढील वर्षीचे ९५ वे अ. भा. साहित्य संमेलन हे विदर्भात होणार आहे. त्याबाबतची माहिती देताना ठाले पाटील यांनी, विदर्भ साहित्य संघाकडून आत्ताच प्रस्ताव आलेला असून स्थळ आणि तारखांचा निर्णय नंतर जाहीर केला जाईल, असे सांगितले. विदर्भ साहित्य संघाला पुढील वर्षी शंभर वर्षे होत आहेत. त्या पाश्र्वभूमीवर महामंडळाने विदर्भात संमेलन देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले.

दिल्लीकर दुखावले..

संमेलन दिल्लीला व्हावे की नाशिकला, हा आमच्यालेखी वादाचा मुद्दा नव्हताच. आमचा आक्षेप फक्त महामंडळाच्या एकतर्फी निर्णयाला होता. हा आक्षेप महामंडळाच्या अध्यक्षांनी ‘वैयक्तिक’ घेऊन दिल्लीतील मराठीजनांचा अपमान केला, मोदी, गडकरींना खुश करण्यासाठी संमेलन मागितले जात असल्याचा आरोप केला.या आरोपांनी आम्ही प्रचंड दुखावलोय, अशी भावना संमेलनाचा प्रस्ताव पाठवणारे दिल्लीतील उद्योजक अशोक चोरडिया व डॉ. अमोल देवळेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केली.

आक्षेप काय?

– अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या घटनेनुसार आलेल्या प्रस्तावांपैकी किमान दोन ठिकाणच्या संमेलनस्थळांची पाहणी केली जाते. आतापर्यंत याच नियमांच्या आधारे संमेलनस्थळाची पाहणी करण्यात आलेली आहे.

– महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी नाशिकमधून आलेल्या दोनपैकी लोकहितवादी संस्थेच्या प्रस्तावाला महत्त्व दिले.

– त्यानुसार गुरुवारी नाशिकला भेट देऊन संमेलनस्थळाची पाहणी केली, असा महामंडळावरील काही पदाधिकाऱ्यांचा आक्षेप आहे.

होणार काय? : नाशिकमधील गोखले शैक्षणिक संस्थेच्या प्रांगणात मार्चमध्ये संमेलन घेण्यात येणार असून त्यासंदर्भातील रूपरेषा येत्या २४ जानेवारीला स्पष्ट होईल. संमेलनाध्यक्षांची निवड प्रक्रियाही २४ जानेवारीलाच पार पडेल. संमेलन नाशिकमध्ये होईल याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’ने गेल्या आठवडय़ात दिले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2021 1:50 am

Web Title: akhil bharatiya marathi sahitya sammelan mppg 94
Next Stories
1 निर्यातीला कच्ची साखर अधिक ‘गोड’!
2 रत्नागिरी जिल्ह्यात करोनाप्रतिबंधक लसीकरणाची रंगीत तालीम यशस्वी
3 मुख्यमंत्र्यांनी ‘त्या १९ मालमत्तां’ची माहिती लपवली
Just Now!
X