प्रबोध देशपांडे

करोनाचे विश्वव्यापी संकट आणि नैसर्गिक आपत्ती अशा दुहेरी दृष्टचक्रात अडकलेल्या शेतकरी वर्गाने विपरीत परिस्थितीतही आपले मनोबल उंच ठेवले. टाळेबंदीच्या काळात विदर्भातील शेतकरी आत्महत्या निम्म्यावर आल्या आहेत. महिन्याला सरासरी १०१ शेतकरी आत्महत्येचे प्रमाण गेल्या तीन महिन्यांत ४८ पर्यंत खाली आले आहे. आत्महत्याग्रस्त सहा जिल्हय़ांतील हे चित्र आहे.

अकोला, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, वाशीम व वर्धा हे सहा जिल्हे २००१ पासून शेतकरी आत्महत्येच्या गर्तेत अडकले आहेत. विविध उपाययोजनांच्या नावावर कोटय़वधींचा खर्च झाला. मात्र, शेतकरी आत्महत्या रोखता तर आल्या नाहीच, त्याचे प्रमाणही कमी करण्यात सर्वानाच अपयश आले. त्यातच करोनाच्या संकटामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. पिकवलेल्या मालाला खरेदीदार देखील मिळाला नाही. कापसासारख्या पिकांची शासकीय खरेदी अतिशय संथ गतीने सुरू आहे.

करोनाच्या आपत्तीपुढे सर्वच क्षेत्र कोलमडले असताना शेतकरी मात्र योद्धय़ाप्रमाणे त्याचा सामना करीत आहेत.  गेल्या पाच वर्षांमध्ये आत्महत्याग्रस्त सहा जिल्हय़ातील ६०९७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. महिन्याकाठी सरासरी १०१ शेतकरी आत्महत्या झाल्या. २०२०मध्येही जानेवारीत ९५ व फेब्रुवारी महिन्यात १०१ शेतकऱ्यांनी जीव दिला. करोनाचा शिरकाव झाल्यापासून मात्र विदर्भातील शेतकरी आत्महत्यांची संख्या अर्ध्यावर आली. मार्च ४६, एप्रिल ४४ व मे महिन्यात ५३ अशा एकूण १४३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. महिन्याची सरासरी ४८ पर्यंत खाली आली. करोना व टाळेबंदीच्या काळात शेतकरी आत्महत्येच्या प्रमाणावर काही अंशी नियंत्रण आले.

आतापर्यंत १७,३७८ शेतकरी आत्महत्या

विदर्भात २००१ पासून सुरू झालेले शेतकरी आत्महत्येचे सत्र आजही कायम आहे. २००१ पासून ३१ मे २०२० पर्यंत एकूण १७ हजार ३७८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यावर्षीही ३३९ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले. गेल्या पाच वर्षांत आत्महत्येचे प्रमाण चांगलेच वाढले होते.

वर्धा जिल्हय़ात एकही आत्महत्या नाही

वर्धा जिल्हय़ात मार्च, एप्रिल व मे महिन्यात एकही शेतकरी आत्महत्येची नोंद झाली नाही. या कालावधीत अकोला जिल्हय़ात १६, अमरावती ३१, यवतमाळ ४६, बुलढाणा ३५ व  वाशीम जिल्हय़ामध्ये १५ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.

शेतकऱ्यांनी आतापर्यंत अनेक संकटांचा धर्याने सामना केला. त्यामुळे ते करोनाच्या आपत्तीपुढेही झुकले नाहीत. टाळेबंदीच्या काळात शेतीची कामे सुरूच होती. शेतकऱ्यांचे आत्मबल वाढल्याने आत्महत्येचे प्रमाण कमी झाले. ही निश्चितच सकारात्मक बाब आहे.

– डॉ. विलास भाले, कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.