पोलिसांच्या दुर्बलतेमुळे हिंमत वाढलेल्या समाजकंटकांनी गुरुवारी थेट भरदुपारी येथील जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोरच एका रिक्षाचालकावर प्राणघातक हल्ला केला. प्रमुख संशयितास पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर भजे गल्लीत रिक्षा थांबा आहे. या थांब्यावर रिक्षा रांगेत लावण्यावरून बाचाबाची सुरू झाली. बाचाबाचीचे रूपांतर वादात होऊन तिघा जणांनी रफियोद्दीन शेख करीम (५५) यांच्यावर हल्ला केला. मुक्तार शेख ताहेर याने शस्त्रास्त्राने रफियोद्दीन यांच्या डोक्यावर वार केला. हल्ल्यानंतर संशयित फरार झाले. इतर रिक्षाचालक व भजे गल्लीतील व्यावसायिकांनी रफियोद्दीन यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक वाय. डी. पाटील यांनी सापळा रचून संशयित मुक्तार शेख मालेगावकडे पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना सायंकाळी इतर सहकाऱ्यांच्या मदतीने त्यास ताब्यात घेतले.