कल्पेश भोईर

वसई हे शहर अनेक वर्षांपासून विविध प्रकारच्या फळ, फुलांसाठी प्रसिद्ध असे शहर आहे. या शहरात मागील काही वर्षांपासून विविध प्रकारचे प्रयोग होऊ  लागले आहेत. शेती क्षेत्र अधिक प्रबळ करण्यासाठी व उत्पन्न मिळविण्याचा एक नवा मार्ग म्हणून याकडे बघू लागले आहेत. परदेशातील वातावरणात येणारे एवोकॅडो हे फळ हे वसईच्या भूमीतसुद्धा होऊ शकते हे एका गृहस्थाने दाखवून दिले आहे.

वसईचा परिसर म्हणजे फळ, फूल, फळभाज्या याने बहरलेला बागायतीपट्टा या भागातील शेतकरी विविध प्रकारचे उत्पादन आपल्या बागायतीमधून घेत असतात. यामध्ये खास करून वसईची केळी अधिक प्रसिद्ध आहेत. तसेच विविध प्रकारची रंगेबेरंगी फुलणारी फुले, रानभाज्या यासारख्या फळभाज्या आधीचा त्यामध्ये समावेश आहे. मात्र वसईच्या भागात येणारी पूरसंकटे, वादळी वारे यामुळे याभागातील शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत असल्याने हल्लीच त्याचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. मात्र अशा स्थितीमध्ये वसईचा शेतकरी टिकला पाहिजे यासाठी वसईच्या धर्तीवर विविध प्रकारचे प्रेरणादायी प्रयोग केले जाऊ  लागले आहेत. वसईतील वटार येथे राहणारे निसर्गप्रेमी मॅथ्यू डीमेलो यांना त्यांच्या परदेशी मित्राने त्यांना एवोकॅडो हे फळ भेट म्हणून दिले होते. या फळाची चव अगदी लोणीसारखी वाटली आणि इतके चविष्ट फळ आपल्या घराच्या आजूबाजूच्या बागेत असावे या हेतूने त्यांनी या फळाचे बी रुजण्यासाठी ठेवले. या बीजाला अंकुर फुटल्याने मॅथ्यू यांचा चेहरा अगदी आनंदून गेला. त्यानंतर या रोपाची योग्य ती मशागत करण्यास सुरुवात केली. गेल्या काही वर्षांत या रोपांचे वृक्ष तयार झाले. मागील काही वर्षांपासून या झाडाला उन्हाळ्यात मोहोर येतो आणि पावसाळा सुरू होताच छान छान अशी हिरवीगार एवोकॅडोची फळही लागू लागली आहेत. या फळाचे नाव एवोकॅडो असे असले तरी आपल्या भागात काही जण बटरफ्रुट या नावानेसुद्धा संबोधले जात आहे. या फळाचे नाव जरी ऐकायला विचित्र वाटत असले तरी हे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असल्याने परदेशात याचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन घेतले जात असून युरोप अमेरिकेसारख्या प्रगतशील देशात अत्यंत लोकप्रिय असलेले फळ हे वसईच्या भूमीतसुद्धा बहरत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

भारतातील एवोकॅडो हे व्यावसायिक फळ नसले तरी दक्षिण व मध्य भारतातील तमिळनाडू, केरळ महाराष्ट्र, कर्नाटक या भागात या फळाचे मर्यादित उत्पादन घेतले जात आहे. एवोकॅडो फळ आता वसईच्या भूमीतील वातावरणातसुद्धा येत असेल तर शेतकऱ्यांना या झाडाची लागवड करून एक जोडधंदा म्हणून यातून चांगले उत्पन्न मिळू शकते, असे मॅथ्यू डीमेलो यांनी सांगितले आहे.

बाजारात या फळाची किंमत ४०० ते ५०० रुपये किलो इतकी आहे. शक्यतो  हे फळ मॉल, मोठमोठी उपाहारगृहे या ठिकाणी विकले जाते.

एवोकॅडो फळाच्या झाडाचे प्रजोत्पादन हे बियाण्याद्वारे केले जात आहे, जेव्हा ही रोपे सहा ते आठ महिन्यांची होतात तेव्हा लावण्यास योग्य होतात. जर ही झाडांची रोपे कलम करून लावली तर तीन ते चार वर्षांतच या झाडांना चांगली फळे येऊ  शकतात. सध्या मॅथ्यू यांच्या घरी असलेल्या झाडाला दर वर्षी तीनशेहून अधिक फळे येतात. या फळातून निघणाऱ्या ज्या बिया आहेत त्यांचे योग्य पद्धतीने रोपण करून त्यापासून तयार करण्यात आलेली रोपे ते आजूबाजूच्या परिसरात भेट म्हणून देऊ  लागले आहेत. आतापर्यंत मॅथ्यू यांनी ५० ते ६० झाडांची रोपे तयार करून भेट म्हणून दिली आहे. जेणेकरून या फळांची सर्वाधिक रोपे वसईच्या भागात तयार होऊन वसईच्या भागातील शेतकऱ्यांच्या समोर उत्पन्नासाठीचा एक नवा पर्याय उभा राहील, असे मॅथ्यू यांनी सांगितले आहे.

एवोकॅडोच्या रोपांचे कोणतीही प्रजोत्पादन करणारी नर्सरी नाही किंवा एवोकॅडोचे व्यावसायिक उत्पादन करण्यासाठी शासकीय व खासगी पातळीवर पुढाकार घेतला गेला नाही. उच्च गुणवत्तेच्या रोपवाटिका उत्पादन करण्याच्या दृष्टिकोनातून जर एखादी संशोधन प्रयोगशाळा सरकारने सुरू केली आणि शेतकऱ्यांना उपयुक्त असे मार्गदर्शन व साहाय्य दिले तर एवोकॅडोच्या उत्पादनात भारतही जगाच्या नकाशावर अव्वल स्थानी असेल असा विश्वास मॅथ्यू डीमेलो यांनी व्यक्त केला आहे.

वर्षभरात इतर अनेक फळांच्या उपलब्धतेमुळे आज एवोकॅडो हे फळ आंबा, संत्री किंवा सफरचंदाइतके लोकप्रिय नसले तरी त्यातील उतच्च पौष्टिक मूल्य आणि अद्वितीय संयुगामुळे आज भारतातही आरोग्य जागरूक लोकांमध्ये खूप लोकप्रिय होत असल्याने नजीकच्या काळात एवोकॅडोला भारतीय बाजारात योग्य स्थान मिळण्याची अपेक्षा असल्याचे मत डीमेलो यांनी व्यक्त केली आहे.