प्रकार उघडकीस आल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

नीरज राऊत, लोकसत्ता

पालघर : तारापूर येथील भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये नव्याने उभारण्यात येणाऱ्या एका प्रकल्पाच्या ठिकाणी रात्रपाळीवर कार्यरत  एका खासगी सुरक्षा रक्षकाने मद्यपान करून धिंगाणा घालण्याचा प्रकार केला. हा प्रकार ज्या वेळी उघडकीस आला त्या वेळी त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर मीरा रोड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बीएआरसी येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या इंटिग्रेटेड न्युक्लियर रिसायकल प्लान्ट या अणू  इंधन पुनप्र्रक्रिया प्रकल्पाचे काम एचसीसी कंपनीच्या मार्फत सुरू आहेत.  प्रकल्पाच्या ठिकाणी सुमारे सातशे कंत्राटी कामगार लेबर कॅम्पमध्ये वास्तव्य करत आहेत. हा प्रकल्प भाभा अणुसंशोधन केंद्राच्या लगत असून प्रकल्प कार्यान्वित न झाल्याने या ठिकाणी खासगी सुरक्षा व्यवस्था कार्यान्वित आहे.

बुधवारी रात्रपाळीत एक सुरक्षा रक्षकने मद्यपान करून कामावर आला. गाडी चालवण्याची लहानपणापासून त्याची प्रबळ इच्छा होती असे सांगितले जाते. ती पूर्ण करण्यासाठी सुरक्षा विभागाच्या ताब्यात असलेली एक नादुरुस्त अवस्थेत असलेली बस सुरू करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एक पिकअप व्हॅन घेऊन गाडी परिसरातं फिरत असताना ही गाडी कठडय़ाला धडकून उलटली. पुढे उलटलेल्या गाडीला सरळ करण्यासाठी त्याने इतर गाडय़ा चालू करण्याचा प्रयत्न  केला होता, अशी माहिती  पुढे आली आहे. या प्रयत्नात एक वाहन रोहित्राला धडकण्यापासून थोडक्यात बचावले व मोठा अपघात टळला असे येथे सांगितले जाते.  हा प्रकार सकाळी उघडकीस आल्यानंतर या सुरक्षा रक्षकाला अधिकारी तसेच पोलिसांनी चौकशीसाठी बोलाविले. त्या वेळी हा प्रकार उघडकीस आला.  त्याला समज देऊन नंतर  घरी पाठवले असता त्याने लेबर कॅम्पमधील खोलीमध्ये गळफास घेण्याचा प्रयत्न केल्याचे तारापूर पोलिसांनी सांगितले.  बचावलेल्या या सुरक्षा रक्षकावर मीरा रोड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून हलगर्जीपणा

नव्याने उभारण्यात येणाऱ्या इंटिग्रेटेड न्युक्लिअर रिसायकल प्लान्टमधे प्रवेश करण्यापूर्वी तारापूर अणुऊर्जा केंद्रपासून १.६ किलोमीटर अंतरावर असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या चौकीमधून तपासणी करून प्रवेश करावा लागतो. अशा परिस्थितीत नव्याने उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पाच्या ठिकाणी दारू सहजच पोहोचली जाते हे या प्रकारावरून उघडकीस आले आहे.  या संपूर्ण परिसरावर सीआयएसएफची देखरेख असणे अपेक्षित आहे. काही वर्षांपूर्वी याच नव्याने उभारण्यात येणाऱ्या ठिकाणाहून महागडी व मोठय़ा लांबीची केबल चोरी झाल्याची घटना उघडकीस आली होती. त्याच पद्धतीने एका ट्रकला पेटवून देण्याचा प्रयत्नदेखील घडला होता. सुरक्षा यंत्रणेतील ढिसाळपणा अशा प्रकारांना कारणीभूत असल्याचे येथे सांगितले जात आहे.

स्थानिक कामगारांचे पुन्हा आंदोलन

पगार व बोनस रकमेसाठी नोव्हेंबर, डिसेंबर २०१९ मध्ये केलेल्या आंदोलनाचा राग धरून एचसीसी कंपनीने घिवली गावातील ७१ कामगारांना २६ फेब्रुवारीपासून कामावरून अचानक  कमी केले होते. त्याच्या निषेधार्थ मार्च महिन्यात घिवली गावातील इतर १२० कंत्राटी कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले होते. टाळेबंदीच्या काळात हे आंदोलन स्थगित ठेवण्यात आले होते. मात्र गेल्या तीन दिवसांपासून पुन्हा सुमारे २०० स्थानिक कंत्राटी कामगारांनी बीएआरसीच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर आंदोलन सुरू केले आहे. एकीकडे स्थानिक कामगारांकडे बीएआरसी व्यवस्थापन दुजाभाव करत असताना परप्रांतीय कंत्राटी कामगारांना गोंजारण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे देशाची सुरक्षितता धोक्यात येत असल्याचा आरोप स्थानिक कामगारांनी केला आहे.