खासगी संस्थेकडून तातडीने विल्हेवाट; सर्वाधिक कचरा मीरा-भाईंदरमध्ये

वसई : वसई-विरारसह पालघर आणि मीरा-भाईंदर या तिन्ही शहरात करोना रुग्णांची संख्या हळूहळू कमी होऊ लागली आहे. त्याचवेळी करोना जैववैद्यकीय कचऱ्यातही घट होत आहे. याआधी दिवसाकाठी ६१६ किलो इतका कचरा निघत होता. तो आता ५६२ किलोवर आला आहे.

वसई विरार, मीरा भाईंदर, पालघर या ठिकाणी करोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी करोना केंद्र उभारण्यात आली आहेत. या उपचारादरम्यान करोनाचा जैववैद्यकीय कचरा निघत आहे. यात पीपीइ संच, मुखपट्टी, बुटांची आच्छादने, रक्ताने दूषित वस्तू, कापूस, रक्ताच्या पिशव्या, सूया, सीरिंज यासह इतर साहित्य यांचा समावेश आहे.

हा कचरा घातक असल्याने खासगी संस्थेकडून तातडीने विल्हेवाट लावली जात आहे. महिनाभरापासून रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे करोना केंद्रातून निघणारा जैविक कचरा ही आता कमी होऊ लागला आहे. ऑक्टोबरमध्ये जवळपास १८ हजार ४९५ किलो इतका जैविक कचरा गोळा केला होता. तर सप्टेंबरमध्ये १७ हजार ४४६ इतका कचरा जमा झाला आहे. त्यामुळे ऑक्टोबरच्या तुलनेत जवळपास एक हजार ४९ किलोने घट झाली आहे.सहा महिन्यांत तिन्ही शहरे मिळून जवळपास ९५ हजार १६० किलो इतक्या कचऱ्याची जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली. यात सर्वाधिक कचरा मीरा-भाईंदर शहरातील असल्याचे जैववैद्यकीय कचरा निर्मूलन प्रकल्प व्यवस्थापक नीलेश पाटील यांनी सांगितले.

 

केंद्रांची संख्याही कमी

उभारण्यात आलेली व अधिग्रहित केलेली करोना केंद्रे टप्प्याटप्प्याने कमी केली जात आहेत.  ऑक्टोबरमध्ये पालघर ११, वसई विरार १६, मीरा भाईंदर २३ अशी एकूण ५० केंद्रातून कचरा घेतला जात होता. रुग्णसंख्येचा आलेख घसरल्याने सप्टेंबरमध्ये यातील  वसईत २ व मिरभाईंदर ३ अशी ५ केंद्र कमी झाल्याने आता ४५ करोना केंद्रातून जैववैद्यकीय कचरा उचलला जात आहे.

मागील सहा महिन्यांत गोळा

केलेला कचरा      ( मे ते सप्टेंबर)

शहर                    जैववैद्यकीय कचरा (किलो)

वसई-विरार        ३५ हजार ३६७

मीरा-भाईंदर       ४९ हजार २१

पालघर                १० हजार ७७२

एकूण                ९५  हजार १६०