माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक चकमक सुरु झाली आहे. अमृता फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर शिवसेनेकडून तीव्र पडसाद उमटत असून जशास तसे उत्तर देण्यात येत आहे. दुसरीकडे अमृता फडणवीस यादेखील माघार घेण्यास तयार नसून ट्विटरच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्यांनी शिवसेनेला उत्तर दिलं आहे.

अमृता फडणवीस यांच्या वक्तव्याचा निषेध करताना पिंपरीत शिवसेनेकडून जोडे मारो आंदोलन करण्यात आलं होतं. ज्या पोस्टरवर हे जोडे मारण्यात आले त्यावर देवेंद्र फडणवीस यांचाही फोटो होता. तसंच यावेळी राघोबादादा जरा आनंदीबाईला आवरा अशा घोषणाही देण्यात आल्या. अमृता फडणवीस यांनी या आंदोलनाचा व्हिडीओ ट्विट करत लिहिलं आहे की, “तुम्ही लोकांना मारहाण करत नेतृत्व करु शकत नाही. हा हल्ला आहे, नेतृत्त्व नाही,” असा टोला अमृता फडणवीस यांनी लगावला आहे.

यावेळी त्यांनी एक शेरही पोस्ट केला आहे –
दिखाओ चप्पल, फेको पत्थर, ये तो शौक़ हैं पुराना आपका,
हम तो वो शक़्स हैं की धुप में भी निखर आएँगे !

अमृता फडणवीस यांनी काय केली होती टीका –
अमृता फडणवीस यांनी ट्विटच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली होती. ‘ठाकरे आडनाव असले तरी कोणी ठाकरे होत नाही. कुटुंब आणि सत्तेपलीकडे जाऊन लोकांसाठी प्रामाणिक काम करावे लागते,’ असे ट्विट अमृता यांनी केले होते.

देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण
“अमृता यांचे व्यक्तिमत्त्व वेगळं आणि स्वतंत्र आहे. त्यांची मतंही स्वतंत्र आहेत. अमृता फडणवीस राजकारणात येणार नाहीत”, असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिलं. काही राजकीय पक्ष आणि कार्यकर्ते त्यांना खालच्या पातळीवर ‘ट्रोल’ करतात. याआधीही अमृता यांना टीकेला सामोरं जावं लागलं होतं, असंही फडणवीस यांनी सांगितलं होतं.

“अमृता या त्यांचे निर्णय स्वत: घेतात. मी तिला काही सांगितलेले नाही. यापूवीही तिने जे लिहिले, त्यानंतर तिला टीका सहन करावी लागली होती. काही राजकीय पक्ष खालच्या पातळीवर टीका करतात,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.