भाजपा नेत्यांनी नाराजी माध्यमांऐवजी पक्षाच्या वरिष्ठांकडे मांडायला हवी होती, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली. विखे पितापुत्रांवर निवडणुकीत पाडापाडी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर काही नेत्यांनी विखे पक्षात आल्यानं पक्षाला त्याचा काहीही फायदा झाला नसल्याचं म्हटलं होतं. दरम्यान, भाजपाच्या उद्याच्या नगर जिल्ह्यातील बैठकीनंतर पक्षश्रेष्ठी निर्णय घेणार आहेत. तसंच आजची बैठकही सकारात्मक झाली असल्याची माहितीही त्यांनी दिली. प्रत्येक पक्षात थोडीफार नाराजी असते. परंतु चर्चेतून मार्ग निघेल, असंही त्यांनी सांगितलं.

माझ्याबद्दल नाराजी आहे असं वाटत नाही. परंतु ज्यांना नाराजी आहे ती त्यांनी माध्यमांना सांगण्याऐवजी वरिष्ठांना सांगायला हवी होती. पक्षाला फायदा झाला किंवा नाही याबाबत वरिष्ठचं सांगतील. पण पक्षात एवढं मोठं काही झालं नाही, असं विखे-पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनादेखील टोला लगावला. बाळासाहेब थोरात हे पक्षश्रेष्ठी घेतात तेच निर्णय घेतात. ते वेगळं काही करत नाहीत. ते पक्षश्रेष्ठींना खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असतात, असंही त्यांनी नमूद केलं.

हे अपघातनं आलेलं सरकार
यावेळी त्यांनी राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारलाही टोला लगावला. सत्तेच्या सारीपाटासाठी शिवसेनेलाच सुधारित नागरिकत्व कायद्याचं काय करायचं हे ठरवायचं आहे. अपघातानं हे सरकार सत्तेत आलं आहे. त्यांच्या मंत्रिपदावर आपण काय बोलणार असंही विखेंनी नमूद केलं.