महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपा आमदार राम कदम यांच्या अडचणी वाढल्या आहेत. राम कदम यांच्याविरोधात बार्शी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रक्षोभक विधान करुन शांतता भंग केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोलापूरमधील बार्शी पोलीस ठाण्यात मंदाकिनी शिवाजी पाटील यांनी तक्रार दिली. महिलांचा अपमान व्हावा या उद्देशाने प्रक्षोभक विधान करुन राम कदम यांनी शांतता धोक्यात येईल, असे कृत्य केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. भारतीय दंड विधानातील कलम ५०४ आणि अन्य कलमांअंतर्गत पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. तर घाटकोपर पोलिसांनीही राम कदम यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, भाजपा आमदार राम कदम यांच्यावर गुन्हा दाखल करता येईल का ?, त्यांच्यावर नेमक्या कोणत्या कलमांखाली गुन्हा दाखल करता येईल, याबाबत पोलिसांनी कायदेतज्ज्ञांचे मत मागवले होते. यापाठोपाठ अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्याने राम कदम यांच्या अडचणी वाढल्या आहेत.