राष्ट्रवादी काँग्रेसऐवजी शिवसेनेसोबत जाण्याचा भाजपचा निर्णय

बोईसर : बोईसरमधील भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी लवकरच संपुष्टात येणार आहे. भाजपने शिवसेनासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी एकत्र येण्यास सुरुवात केली आहे. भाजपच्या नेत्याने बोईसरच्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिला आहे.

गेली अडीच वर्षे बोईसर ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची आघाडी आहे. ग्रामपंचायतीत शिवसेना ५ सदस्य, भाजप ५ सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस ५ सदस्य आणि  बहुजन विकास आघाडी दोन सदस्य आहेत. शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने थेट राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. भाजपने सरपंच पद हे राष्ट्रवादीसाठी व उपसरपंच पद हे स्वत:कडे ठेवले होते. यावेळी उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी भाजपचे राजेश करवीर व शिवसेनेचे नीलम संखे एकमेकांविरोधात उभे होते. बहुजन विकास आघाडीच्या सदस्यांनी शिवसेनेला पाठिंबा देत शिवसेनेला ७ सदस्यांनी मतदान केले, तर भाजपला १० सदस्यांच्या मतदानामुळे भाजपचे राजेश करवीर हे विजयी झाले होते.

लोकसभा निवडणुकीत वरिष्ठांच्या आदेशानुसार बोईसरमध्ये एकमेकांच्या अतिशय विरोधात असलेले भाजपचे कृषी सभापती अशोक वडे व शिवसेनेचे ग्रामपंचायत सदस्य नीलम संखे यांना एकत्र येऊन प्रचार करावा लागला होता. यावेळी भाजप शिवसेनेमधील दरी काही प्रमाणात कमी झाल्याची पाहावयास मिळत होती. बोईसर परिसरात युतीच्या उमेदवारांचे मताधिक्यदेखील वाढले असल्याचे दिसून आले असून आगामी काळात युतीची सत्ता बोईसरमध्ये असावी यासाठी हालचालींना वेग आला आहे. भाजपचे उपसरपंच राजेश करवीर यांचा राजीनामा पक्षांकडून मागून घेण्यात आला आहे. बोईसरमध्ये भाजप शिवसेनेची दिलजमाई झाल्याची चर्चा जोर धरू लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दूर कसे ठेवता येईल, यासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे.

सत्ता स्थापण्यासाठी सरपंचावर अविश्वास ठराव आणणे गरजेचे

बोईसरमधील सरपंच पद हे राष्ट्रवादीकडे आहे. भाजप-शिवसेना यांची युती झाल्यावर उपसरपंच व सरपंच पद आपल्याकडे ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरपंचविरोधात अविश्वास ठराव घेऊन युतीला दोन्ही पदे आपल्याकडे ठेवता येतील. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या पदाधिकारी यांचे असलेले चांगले संबंध यामुळे सरपंचावर अविश्वास ठराव घेणे म्हणावे तसे सोईस्कर दिसत नाही. त्यातच भाजपचे राजेश करवीर यांना राजीनामा देण्यासाठी भाग पाडल्याने यांचा पक्षांच्या नेत्यांवर नाराजीचा सूर आहे. ते शिवसेनेच्या सदस्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. शिवसेना ठरवेल त्या उपसरपंचाला निवडून आणण्याची राजकीय खेळी खेळली जात आहे.

भाजप-शिवसेनेपुढे आव्हान

बोईसर नगर परिषद होण्याची चिन्ह असून नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी नगर परिषद जाहीर होण्याची शक्यता आहे. यामुळे नगर परिषदेत युती करावी लागणार असल्याने भाजप-शिवसेना विरोधाची प्रतिमा असलेल्या दोन्ही पक्षांना एकत्र मतदारांपुढे जाण्याचे आव्हान स्वीकारावे लागणार आहे. गेल्या चार वर्षांत एकमेकांविरोधात हात उचलणारे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी याचवेळी एकत्र येऊन आगामी काळात युती धर्म निभावण्यासाठी सज्ज झाल्याचे दिसून येते. मात्र हे संपूर्ण राजकारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किती पचनी पडते हे येणारा काळच ठरवेल, असे म्हटले जात आहे.