शेतजमिनीच्या वादावरून आणि वारंवार होणाऱ्या शिवीगाळ, दमदाटीमुळे वैफल्यग्रस्त झालेल्या वासुळ येथील शेतकऱ्याने सप्तशृंग गडावरील जंगल परिसरात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय रामचंद्र आहिरे (रा. मूळ वाखारी) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून कळवण पोलिसांनी १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करत सात जणांना अटक केली. मयत शेतकऱ्याची पत्नी ताराबाई आहिरे यांनी तक्रार दिली. शेतीच्या हिश्शावरून भाऊ, बहीण व जवळच्या नातेवाईकांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून ते वैफल्यग्रस्त झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच मयत संजय आहिरे यांनी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली. या प्रकरणी रामचंद्र आंबू आहिरे, चंद्रकांत रामचंद्र आहिरे, निर्मला एकनाथ निकम, कल्पना अरुण पगार, अरुण राजाराम पगार, माधव तुळशीराम निकम, आबा महादू निकम यांना अटक करण्यात आली तर राजेंद्र अरुण पगार, सुमन बाबाजी सोनवणे, विलास बाबाजी सोनवणे, संगीता चंद्रकांत आहेर, एकनाथ देवबा निकम, गणेश एकनाथ निकम या संशयितांचा पोलीस शोध घेत आहे.