सांगलीतील सिंदूर खेडय़ात १८ महिन्यांपासून विनाशिक्षक शाळा

सांगली : पैसे, दागिने, मोबाइल चोरीला जाण्याचे प्रकार यापूर्वी ऐकले असतील, पण ‘शिक्षक चोरीला गेले आहेत..’ अशी तक्रार जर कुणी दिली तर? गेले १८ महिने शाळेत शिक्षक येत नसल्याने सांगलीतील सिंदूर गावच्या नागरिकांनी ही तक्रार दाखल केली आहे.

सांगलीतील जतपासून २६ किलोमीटर अंतरावर कर्नाटक सीमेलगत हे सिंदूर गाव आहे. गावात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. एकशिक्षकी असलेल्या या शाळेतील शिक्षकाची जागा अठरा महिन्यांपूर्वी रिक्त झाली. यानंतर आजपर्यंत या शाळेला नवीन शिक्षक मिळालेला नाही. ग्रामस्थांनी मागणी, निवेदने देऊन झाली; पण फरक पडला नाही. शेवटी गेल्या वर्षी आंदोलन केल्यावर शेजारच्या गावातील शिक्षकास सिंदूरमध्ये जाऊन शिकवण्याचा तोंडी आदेश देण्यात आला. मात्र हा एकच शिक्षक एकाच वेळी दोन वेगळ्या गावांत जाऊन कसे शिकवणार, हा प्रश्न असल्याने त्यांच्यासाठीही हे शिकवणे अशक्यप्राय बनले आणि मग हा तोंडी आदेशदेखील हवेतच विरला.

आता नवे शैक्षणिक वर्ष नुकतेच सुरू झाले. या वर्षी तरी शाळेला शिक्षक मिळेल अशी ग्रामस्थांना आशा होती; पण सिंदूरची शाळा पुन्हा शिक्षकाविना भरू लागली. गावातील मुलांचे होत असलेले हे शैक्षणिक नुकसान पाहून अखेर संतप्त गावक ऱ्यांनी आपल्या गावातील शाळेचे ‘गुरुजी चोरीला गेले आहेत’ अशी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची प्रत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवली आहे.

शिक्षण की ‘शिक्षा’?

गेल्या अठरा महिन्यांत या शाळेतील मुले रोज गावच्या रिकाम्या शाळेत जातात. शिक्षक नसलेल्या वर्गात जाऊन बसतात. शाळेची वेळ संपली, की घरी परततात. गेले दीड वर्षे हे ‘सर्व शिक्षा अभियान’ अशाच पद्धतीने सुरू आहे. ना शिक्षण, ना कुठले शैक्षणिक उपक्रम. वर्षांच्या शेवटी परीक्षा घेण्यासाठी एक शिक्षक आले आणि वर्गातील सर्व मुले पुढच्या इयत्तेत गेली. हे विद्यार्थ्यांचे शिक्षण की ‘शिक्षा’ हा प्रश्न आता पडायला लागला आहे.

शिक्षकांची संख्या कमी

सांगली जिल्हय़ासाठी आवश्यक पदसंख्येच्या तुलनेत तब्बल ६२८ प्राथमिक शिक्षकांची कमतरता आहे. यामुळे अनेक ठिकाणी शिक्षकांची मागणी असतानाही ती पूर्ण करणे शक्य होत नाही. अशा वेळी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून जवळच्या शाळेतील शिक्षकांकरवी पर्यायी व्यवस्था उभी केली जात आहे.

निशादेवी वाघमोडे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग