शेती आणि कर्जाच्या समस्येबाबत गाऱ्हाणे मांडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्री येथे आलेल्या आणि नंतर मातोश्रीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याची अखेर मुख्यमंत्री ठाकरे यांनी दखल घेतलीये.

देशमुख असे या शेतकऱ्याचे नाव असून ते मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी पनवेलवरून वांद्रे येथील मातोश्री येथे आले होते. त्यांच्यासोबत त्यांची लहान मुलगीही होती. काही काळ मातोश्रीबाहेर ते ठाण मांडून बसले होते. काहीच होत नाही असे लक्षात आल्यानंतर त्यांनी मातोश्रीमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. त्यांना कर्ज आणि शेती संदर्भातील गाऱ्हाणे मुख्यमंत्र्यांकडे मांडायचे होते. पण, सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी त्यांना अडवले आणि ताब्यात घेतले. पोलीस स्थानकात नेण्यासाठी व्हॅनमध्ये बसवताना शेतकरी आणि पोलिसांची चांगलीच बाचाबाची झाली. शेतकरी सातत्याने म्हणत होता की, मला घरी जाऊद्या पण पोलिसांनी चौकशीसाठी त्यांना खेरवाडी पोलीस स्थानकात नेले.

दुपारी १२ च्या सुमारास घडलेल्या या घडामोडीनंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी शेतकऱ्याची तातडीने दखल घेतली. “मातोश्रीवर आलेल्या त्या शेतकऱ्याला पोलिसांना सोडण्यास सांगितले आहे , तसेच त्यांचे काय काम आहे याबाबत विचारपूस करण्यास सांगितले आहे”, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.