News Flash

वेकोलितील आगी वन्यजीवांच्या मुळावर

वेकोलिच्या कोळसा खाणींना नेहमी लागणारी आग व धुराचे प्रदूषण ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ८२ वाघ, बिबटे व अन्य वन्यजीवांसह चंद्रपूर शहरातील नागरिकांसाठीही अतिशय धोकादायक आहे.

| September 15, 2014 02:17 am

वेकोलिच्या कोळसा खाणींना नेहमी लागणारी आग व धुराचे प्रदूषण ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ८२ वाघ, बिबटे व अन्य वन्यजीवांसह चंद्रपूर शहरातील नागरिकांसाठीही अतिशय धोकादायक आहे. प्रसंगी जीवित हानीची शक्यता सुध्दा आहे. वन्यजीव विभाग व जिल्हा प्रशासनाने वेकोलि व्यवस्थापनाला यासंदर्भात वेळोवेळी नोटीस देऊन कानउघाडणी केली असली तरी मुजोर अधिकारी काही ऐकायला तयार नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.
चंद्रपूर जल्ह्य़ात वेकोलिच्या २९ कोळसा खाणीत आहेत. यातील दुर्गापूर, पद्मापूर, सिनाळा, रैय्यतवारी, दुर्गापूर ओपन कास्ट व अन्य काही कोळसा खाणी थेट आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पापासून अगदी पाच-सहा कि.मी. अंतरावर आहेत. कोळसा उत्खननाच्या वेळी वेकोलिच्या खाणींना नेहमीच आग लागते. त्यामुळे या परिसरात मोठय़ा प्रमाणात धूर निघतो. कधी कधी तर आगीचे लोळ उठतात, तर कधी विषारी वायूची गळती होते. या सर्व बाबी वन्यजीवांच्या दृष्टीने अतिशय हानीकारक आहेत. प्रसंगी आगीने रौद्ररूप धारण केले तर ती विझता विझत नाही, हा अनुभव वेकोलि व स्थानिक प्रशासनाच्या गाठीशी आहे. इतके होऊनही याकडे मात्र दुर्लक्ष केले जाते.  
आज ताडोबात ८२ पट्टेदार वाघांसह बिबटे व अन्य वन्यजीवांचे वास्तव्य आहे. कोळसा खाणींमुळे वन्यजीवांना त्रास होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे काम वेकोलिचे आहे, परंतु वेकोलिचे अधिकारी निगरगट्ट असून मुख्यमंत्र्यांना सुध्दा ते गांभीर्याने घेत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे वेकोलि अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाला ठोस भूमिका घ्यावी लागणार आहे. वेकोलिच्या काही भूमिगत व खुल्या खाणीतून कोळसा काढण्यात आलेला आहे, परंतु तेथे रेती भरली गेली नसल्यामुळे मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत. पावसाळ्यात या खड्डय़ांमध्ये बरेच पाणी साचलेले असते. ताडोबातील वाघ व बिबटय़ांसह अन्य प्राणी भटकंतीवर असतात. त्यामुळे ते खड्डय़ात पडून त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी वेकोलिच्या अशाच खड्डय़ांमध्ये दुर्गापूर व लालपेठ कॉलरी परिसरातील मुलाचा बुडून मृत्यू झाला होता. या घटना प्रत्यक्ष डोळ्यासमोर दिसत असतांनाही वेकोलि अधिकारी स्वत: काहाही प्रयत्न करतांना दिसत नाही.
दरम्यान, सिनाळा खाणीत लागलेली आगही वाघ व अन्य वन्यप्राण्यांसाठी अतिशय घातक आहे. खाणीतून निघणारा विषारी वायू परिसरात पसरला व आगीचे लोळ, धूर जंगल परिसरात दिसत होता. हे वन्यप्राण्यांच्या जीवासाठी अतिशय घातक आहे. दुसरीकडे चंद्रपुरातील नागरिकांच्या आरोग्यासाठीही  हे प्रदूषण अतिशय घातक आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने वेकोलिच्या अधिकाऱ्यांना आताच वठणीवर आणावे अन्यथा, त्यांची मुजोरी वाढतच जाईल, असे वन्यजीवप्रेमींचे म्हणणे आहे. दरम्यान, यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी वेकोलिला वारंवार नोटीसा बजावून उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. गेल्या वर्षी पूर परिस्थितीच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी स्वत: क्षेत्रीय महाव्यवस्थापक रमाकांत मिश्रा यांची चांगलीच कानउघाडणी केली होती, परंतु वेकोलिचे अधिकारी पुन्हा त्याच पध्दतीने काम करीत आहेत. यावर वेळीच उपाय केले गेले नाही, तर भविष्यात वेकोलिच्या खाणी कधी ताडोबापर्यंत जाऊन पोहोचतील याचाही थांगपत्ता लागणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2014 2:17 am

Web Title: coal mine fire in chandrapur dangerous for wildlife
Next Stories
1 चंद्रपूर जिल्ह्य़ात वीज कोसळून १० जणांचा मृत्यू
2 निवडणुकीनंतर एम.फुक्टो. चा आंदोलनाचा इशारा
3 आगग्रस्त सिनाळा खाणीला सील, ५०० कामगार अन्यत्र हलविणार
Just Now!
X