खारघरमध्ये बुधवारी सकाळी पार्क केलेल्या एका बाईकच्या मागच्या सीटवर कोब्रा नाग आढळला. त्यामुळे काही वेळासाठी परिसरात खळबळ उडाली होती. बाईकवर कोब्रा नाग असल्याचे समजल्यानंतर लगेच तिथे बघ्यांची गर्दी जमली. काही अतिउत्साही बघे जेव्हा कोब्राला पाहण्यासाठी त्याच्या जवळ गेले त्यावेळी या नागाने त्याचा फणा बाहेर काढताच एकच पळापळ झाली.
खारघर सेक्टर ७ मध्ये सिमरन हाऊसिंग सोसायटीच्या बाहेर उभ्या असलेल्या बाईकच्या मागच्या सीटवर हा कोब्रा नाग होता. या कोब्राला पकडण्यासाठी सर्पमित्र रघुनाथ जाधव यांना बोलावण्यात आले. कोब्राला त्या बाईकवरुन हटवणे इतके सोपे नव्हते असे रघुनाथ यांनी सांगितले. मी ज्यावेळी घटनास्थळी पोहोचलो त्यावेळी कोब्राचे डोके सीटच्या वर तर बाकीचा भाग आतमध्ये होता. त्यामुळे ही बचाव मोहिम थोडीशी कठिण आणि धोकादायक होती.
मी ज्यावेळी सीटला स्पर्श करायला जायचो त्यावेळी हा कोब्रा आक्रमक होऊन अंगावर येत होता. पण अखेर त्यांनी या कोब्राला दंश करता येणार नाही अशा पद्धतीने पकडले. उंदीर किंवा अन्य भक्ष्याचा पाठलाग करताना हा नाग बाईकवरती आला असावा असे रघुनाथ जाधव म्हणाले. वनखात्याच्या अधिकाऱ्यांना समजल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले व त्यांनी या कोब्राला ताब्यात घेऊन जंगलात सोडले. पावसाळयात पाणी साचत असल्यामुळे अनेकदा साप त्यांचे बीळ सोडून बाहेर पडतात. रविवारीच खारघरमधून तीन अजगरांची सुटका करण्यात आली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 6, 2018 4:58 am