श्रीरामपूर : घरातील किरकोळ वादातून कोंढवड ( ता. राहुरी ) येथील शुभम किशोर बनसोडे ( वय २० ) या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांने मुळा नदीपात्रात पाण्यात उडी घेऊ न आत्महत्या केली.

शुभम किशोर बनसोडे हा मूळचा  सलाबतपूर (ता. नेवासा)  येथील असून, वडील वारल्यानंतर तो आई व बहिणीसह मामाच्या घरी शेजवळ कुटुंबात कोंढवड (ता. राहुरी) येथे राहत होता. तो राहुरी महाविद्यालयात वाणिज्य शाखेत  प्रथम वर्षांत शिक्षण घेत होता. परीक्षा फी भरण्यासाठी त्याने घरातून पैसे घेतले होते. परंतु गणेशोत्सव काळात तो महाविद्यालयात गेला नाही. दरम्यान, परीक्षा फी भरण्याची विहित मुदत संपल्याने, दंडाच्या रकमेसह त्याला परीक्षा फी भरावी लागली. त्यामुळे घरात किरकोळ वाद झाला होता. रागाच्या भरात तो सोमवारी दि. १६ रोजी  घरातून निघून गेला होता. तेंव्हापासून त्याचा शोध सुरु होता.

आज सकाळी साडेसहा वाजता शुभमचा मृतदेह मुळा नदीत पाण्यावर तरंगताना आढळला. पोलीस पाटील सदाशिव तागड यांनी राहुरी पोलीस ठाण्यात खबर दिली. घटनास्थळी तलाठी वर्षां कातोरे, पोलीस कर्मचारी  सोमनाथ जायभाये व आदिनाथ पारखी यांनी पंचनामा केला. राहुरी पोलीस ठाण्यात या संदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. किरकोळ कारणावरून शुभम याने जीवनयात्रा संपविल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.