जिल्हय़ाच्या राजकारणात कमालीचे महत्त्व असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विद्यमान सत्ताधारी राष्ट्रवादी-थोरात गटाला काठावरच्या बहुमतावर रोखण्यात विखेंना यश आले. ऐनवेळी भाजपक्ष-शिवसेना युतीला बरोबर घेत विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी बँकेत जोरदार मुसंडी मारली. संचालकांच्या २१ पैकी राष्ट्रवादी-थोरात गटाला ११ आणि विखे-भाजप-शिवसेना अशा संयुक्त आघाडीला १० जागा मिळाल्या. आता अध्यक्ष कोण, याबाबत जिल्हय़ात उत्सुकता आहे.
जिल्हा बँकेची सत्ता राष्ट्रवादी-थोरात गटाने जिंकली असली तरी निसटत्या आघाडीमुळे याबाबत उत्सुकता व्यक्त होते. माजी आमदार राजीव राजळे यांनी निवडणुकीच्या ऐन तोंडावर त्यांनी त्यांचे मामा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, पालकमंत्री राम शिंदे, आमदार कर्डिले असा सर्वावरच टीका करीत स्वत:चे सात वेगळेच उमेदवार त्यांनी जाहीर केले होते. मात्र आता राजळे व श्रीगोंदे सेवा संस्थेतील विजयी उमेदवार दत्ता पानसरे यांच्यासह विखे गटाने १० संचालकांचा दावा केला आहे.    
प्रमुख विजयी उमेदवारांमध्ये ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख, बँकेचे अध्यक्ष बाजीराव खेमनर, आमदार अरुण जगताप, बिपीन कोल्हे, शिर्डी संस्थानचे माजी अध्यक्ष तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांचा समावेश आहे. २१ पैकी सहा जागा पूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित १५ जागांसाठी निवडणूक झाली.