News Flash

Coronavirus: “शेतकऱ्यांकडून दूध, भाजी खरेदी करण्यास नकार देणाऱ्यांवर कारवाई करा”

दूध आणि भाजी खरेदीस नकार देणाऱ्या डेअरी आणि बाजार समित्यांवर कारवाई करावी

संग्रहित छायाचित्र

करोना विषाणूचा प्रादुर्भाव आपल्या जिल्ह्यात होऊ नये यासाठी इतर जिल्हा, राज्यातून जिल्ह्यात आलेल्या व्यक्तींची माहिती २४ तासात जमा केली गेली पाहिजे. त्यांना तात्काळ विलगीकरणाच्या सूचना देऊन त्यांच्यावर लक्ष ठेवावे. तसेच भाजी बाजार बंद करणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि पशुपालकांकडून दूध घेण्यास नकार देण्याऱ्या मोठ्या दूध डेअरी आणि विक्री संघावर कारवाई करावी असा आदेश वर्ध्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी दिला आहे.

सुनील केदार यांनी सांगितलं की, राष्ट्रीय आपत्ती आणि साथरोग प्रतिबंध कायद्यांतर्गत जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा सुरळीत करणे ही शासन, प्रशासनाची जबाबदारी आहे. अशा परिस्थितीचा गैरफायदा घेऊन बाजार समित्या, डेअरी, दूध विक्री संघ हे शेतकऱ्यांकडून भाजी आणि दूध घेण्यास नकार देत असतील आणि त्यामुळे टंचाई परिस्थिती निर्माण होत असेल तर अशा समित्या आणि संघावर तात्काळ कारवाई करावी.

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री श्री केदार यांनी करोना संदर्भात आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओंबासे, पोलीस अधीक्षक बसवराज तेली, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पुरुषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अजय डवले, उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे उपस्थित होत्या.

“जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कंपन्याना शासनाने लॉकडाऊन मधून वगळले आहे. तसेच शेतीची कामे सुद्धा यातून वगळण्यात आली आहेत. पशुखाद्य दुकाने सुरू ठेवण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. तसेच याची वाहतूक करणाऱ्या वाहतुकदारांना सुद्धा लॉक डाऊन मधून वगळण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना त्रास होणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

“करोना विषाणूचे संक्रमण जास्त वाढू नये म्हणून शासनाने संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदीचा उद्देश लोकांना समजून सांगा. जनतेमध्ये करोना विषाणू बाबत जनजागृती करा. नागरिकांनी स्वत: हून संचारबंदी लावून घेतली तर पोलिसांचा ताण कमी होईल. सामाजिक संस्थांची मदत घ्या,” अशी सूचना यावेळी त्यांनी दिली. जीवनावश्यक वस्तू यांच्याव्यतिरिक्त सुरू राहणाऱ्या दुकानदारांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.

जिल्ह्यात अन्नधान्य साठा पुढील दोन महिने पुरेल एवढा असून अन्नधान्य महामंडळाच्या गोदामात मुबलक साठा असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. तेलाचे उत्पादन करणाऱ्या ऑइल मिल मालकांशी चर्चा करण्यात येत आहे. साखर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातुन येते, त्यामुळे तेथील जिल्हाधिकारी यांच्याशी सुद्धा संपर्कात असल्याचे जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी सांगितले. जिल्ह्यात सध्या एकही करोनाबाधित रुग्ण नाही. पण प्रशासन अलर्ट आहे. अलगीकरण कक्ष तयार आहेत. मास्क, सॅनिटायझर, औषधं यांचा पुरवठा आदेश देण्यात आले असून एक, दोन दिवसात आपल्याकडे त्याचा मुबलक साठा असेल. तसेच नर्सेस आणि डॉक्टरांचे प्रशिक्षणही घेण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2020 4:23 pm

Web Title: coronavirus guardian minister orders action refusing to buy milk and vegetables from farmers in wardha sgy 87
Next Stories
1 Coronavirus: राज्यात अनेक ठिकाणी दवाखाने बंद, कुटुंबीय भीतीच्या छायेत
2 Coronavirus: दिलासादायक बातमी: महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांपैकी आत्तापर्यंत १५ जणांना डिस्चार्ज
3 भारतात लोकांची तस्करी सुरू आहे का? व्हिडीओ बघून रितेश संतापला
Just Now!
X