अडवून ठेवलेला पाण्याचा टँकर सोडण्यासाठी चार हजारांची लाच घेतल्याप्रकरणी सोलापूर शहर वाहतूक शाखेतील पोलीस निरीक्षकासह चार पोलिसांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या चारपकी तिघा जणांना विशेष न्यायालयात हजर केले असता सर्वाना प्रत्येकी पंधरा हजारांच्या जातमुचलक्यावर जामिनावर मुक्त करण्याचा आदेश विशेष न्यायालयाने दिला.
पोलीस निरीक्षक रवी घोडके यांच्यासह सहायक फौजदार अनिल पोरे आणि पोलीस शिपाई आतिश काकासाहेब पाटील अशी जामिनावर सुटका झालेल्या आरोपींची नावे आहेत. चौथा आरोपी पोलीस शिपाई कोरबू हा हजर झाला नाही.
पाणीपुरवठा करणारा एक टँकर शहर वाहतूक शाखेतील पोलीस शिपाई मोहिद्दीन कोरबू याने पकडून सरस्वती चौकातील वाहतूक शाखेत ठेवला होता. टँकरमालकाने टँकर सोडून देण्यासाठी संपर्क साधला असता पोलीस निरीक्षक रवी घोडके यांनी चार हजारांची लाच मागितली आणि लाचेची रक्कम पोलीस शिपाई कोरबू यांच्याकडे देण्यास सांगितले. टँकरमालकाने पोलीस निरीक्षक घोडके यांची दुसऱ्यांदा भेट घेतली असता त्यांनी लाचेची रक्कम सहायक फौजदार अनिल पोरे यांच्याकडे जमा करण्यास सांगितले. त्यानुसार पोरे यांना भेटले असता त्यांनी लाचेची रक्कम शेजारच्या पोलीस शिपाई आतिश पाटील याजकडे देण्यास सांगितले. त्यामुळे पोलीस निरीक्षक घोडके व सहायक फौजदार पोरे यांच्या सांगाण्यावरून पाटील याने लाच स्वीकारली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पाटील यास रंगेहाथ पकडले. या प्रकरणी पोलीस निरीक्षक घोडके यांच्यासह चौघा पोलिसांविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सोलापूर कार्यालयातील सहायक पोलीस आयुक्त गणेश जवादवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.