पेरलेले सोयाबीन बियाणे न उगवल्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली. हा प्रश्न सोडविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी विभागात ठिय्या आंदोलन केले. पंचनामे करून गुन्हे दाखल केले जातील, असे सांगण्यात आले होते. पंचनामे क रण्यात आल्यानंतर सेनगाव पोलिसात ‘ईगल सीड्स अँड बायोटेक लि. इंदोर’ ‘अंकुर सीड्स’ या दोन कंपनींच्या विरोधात कृषी अधीक्षकांनी गुन्हे नोंदविले आहेत. अशा प्रकारच्या सहा हजार तक्रारी जिल्ह्यत आल्याची माहिती कृषी विभागातून देण्यात आली.

पेरलेले सोयाबीन बियाणे न उगवल्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली. त्यामुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट पसरली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेतावर जाऊन पंचनामे करा व गुन्हे दाखल करण्याची मागणी कृषी विभागाच्या कार्यालयात करत असताना अधिकारी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांत वाद निर्माण झाला. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खुर्च्यांची तोडफोड केली. त्यानंतरही कृषी विभागाने दखल न घेतल्यामुळे तीन दिवसापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. लेखी आश्वासन दिल्याशिवाय माघार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतल्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे यांनी गुन्हे दाखल करण्याचे लेखी आश्वासन दिल्यावर आंदोलन करते मागे फिरले होते.

सेनगाव पोलिसात शुक्रवारी कृषी अधिकारी तथा बियाणे निरीक्षक संदीप सखाराम वळकुंडे व कृषी विस्तार अधिकारी प्रताप पुंजाजी गाडे यांच्या फिर्यादीवरून मे.ईगल सीड्स अँड बायोटेक ली. इंदोर कंपनीचे व्यवस्थापक राजकुमार मारुती बाबर, व मे. अंकुर सीड्सचे व्यवस्थापक रवींद्र श्रीकांत बोरकर यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहत. उगवण न झालेल्या सहा हजार शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या.

नांदेडमध्येही गुन्हा

धर्माबाद येथील शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणांच्या उगवण क्षमतेविषयी तक्रार केल्यानंतर कृषी विद्यापीठामार्फत केलेल्या तपासणीमध्ये ‘सारस अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज’च्या बियाणांची उगवण क्षमता केवळ १८ ते ३५ असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर कृषी अधिकारी विश्वास अधापुरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मध्यप्रदेशातील सोयाबीनच्या क्षेत्रीय व्यवस्थापकाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. जिल्ह्यत सोयाबीन उगवले नसल्याचा तक्रारीची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक उजगरे करीत आहेत.