मानसी जोशी

टीव्हीसाठीचे नवे दरपत्रक हे ग्राहकांचे हित लक्षात घेऊनच लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा दावा दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडून (ट्राय) केला जात असला तरीही प्रत्यक्षात नवीन धोरणानुसार ब्रॉडकास्टर्सकडून जाहीर करण्यात आलेल्या बुके (वाहिन्यांचा समूह ) दरात ३ ते १३ रुपयांनी दरवाढ झाली झाल्याचे दिसून येते. तसेच जास्त टीआरपी असणाऱ्या वाहिन्यांचे दरही १५ ते २० टक्क्यांनी वाढणार असल्याची शक्यता केबलचालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. परिणामी ट्रायच्या नवीन सुधारित नियमावलीमुळे ग्राहकांना टीव्ही पाहण्यासाठी जास्तीचा आर्थिक भार सोसावा लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

दूरसंचार नियमन प्राधिकरणाच्या (ट्राय) सुधारित नियमावलीनुसार ग्राहकांना १३० रुपयांत १०० ऐवजी २०० वाहिन्या दाखवण्यात येणार आहेत. याचबरोबर वाहिन्यांचे मूल्य १९ वरून १२ रुपयांवर आणत एकाच घरातील दुसऱ्या टीव्हीसाठी ६० टक्के सवलत देण्याचे आदेश ट्रायने दिले आहेत. या नियमाची अंमलबजावणी केबलचालक आणि मल्टी सर्व्हिस ऑपरेटरमध्ये (एमएसओ) १५ जानेवारीपासून तर ग्राहकांसाठी १ मार्चपासून लागू करण्यात येईल. त्यानुसार काही ब्रॉडकास्टर्सनी वाहिन्यांच्या समूहाचे (बुके) सुधारित दरपत्रक जाहीर केले असून त्यात ३ ते १३ रुपयांनी वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे. बुकेच्या सुधारित दरपत्रकाव्यतिरिक्त स्वतंत्रपणे खरेदी करायच्या वाहिन्यांचे मूल्य १५ ते २० टक्क्यांनी वाढू शकते, तसेच वाहिन्यांचे दर बदलाचे स्वातंत्र्य ट्रायने ब्रॉडकास्टर्सना दिल्याने त्यांचे दर अवाच्या सव्वा वाढतील, अशी भीतीही केबलचालक व्यक्त करत आहेत.

ब्रॉडकास्टर्सनी सर्वात जास्त टीआरपी असलेल्या वाहिन्या सध्या बुकेमधून वगळल्या असून त्यांचे मूल्य १२ रुपयांपेक्षा जास्त आकारले जाईल अशी चर्चा केबलचालक आणि ग्राहकांमध्ये रंगली आहे. ‘ग्राहकांचे वाहिन्या निवडीचे स्वातंत्र्य हिरावले असून त्यामुळे के बलचालकांचे उत्पन्नही घटणार आहे. नवीन नियमानुसार बुके (वाहिन्यांच्या समूहात) समाविष्ट नसलेल्या वाहिन्या ग्राहकांना स्वतंत्रपणे खरेदी कराव्या लागतील. २०१८ मध्ये ग्राहकांकडून घेण्यात आलेल्या दरापेक्षा यात दुपटीने वाढ होणार असल्याची शक्यता शिवकेबल सेनेचे सरचिटणीस विनय (राजू) पाटील यांनी व्यक्त केली. ‘बुकेच्या दरपत्रकानुसार ग्राहकांना स्वतंत्रपणे खरेदी करणाऱ्या वाहिन्यांच्या किमतीचा अंदाज लावता येऊ शकतो. यामुळे वाहिन्यांचे दर १५ ते २० टक्के वाढतील’ अशी माहिती महाराष्ट्र केबल ऑपरेटर फाऊंडेशनचे अध्यक्ष अरविंद प्रभू यांनी दिली आहे.