मोहन अटाळकर

परतीच्या पावसाने पश्चिम विदर्भात कहर केला असून सोयाबीन, कापूस, मका, संत्री बागांसह इतर पिकांचे कोटय़वधींचे नुकसान आतापर्यंत झाले आहे. निसर्गाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला. यंदा पिकांची स्थिती चांगली असताना काढणीच्या वेळी कोसळलेल्या या संकटाने शेतकरी हवालदिल झाला आहे.

यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने पीक चांगले बहरले. यामुळे दिवाळी उत्साहात साजरी होईल, अशी आशा शेतकऱ्यांना असताना परतीच्या पावसाने सारे काही उद्ध्वस्त केले. कोणतेही पीक त्यातून वाचले नाही. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात परतीच्या पावसाने सुरुवात करून देत काढणीवर आलेल्या पिकाचे अतोनात नुकसान केले होते. या संकटाचा सामना केल्यानंतर शेतकऱ्यांनी यंदा कर्ज व उसनवारी करून खरिपाची पेरणी केली. सोयाबीन काढणीचा नुकताच हंगाम सुरू झाला होता. परतीच्या या पावसाने सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची काढणी करून शेतात ढीग रचले आहेत. तर काही शेतकऱ्यांची सोंगणी केलेली सोयाबीन जमिनीवर तशीच पडून आहे.

सततच्या पावसामुळे मूग आणि उडदाचा हंगाम केव्हाचाच हातून गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची उरलीसुरली मदार सोयाबीन व कापूस पिकावर होती. परंतु सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात पावसामुळे शेकडो हेक्टर क्षेत्रावरील पिकाची नासाडी केली आहे. सततच्या पावसामुळे सोयाबीनच्या शेंगाना कोंब फुटले असून कापसाची फुले, पाती व बोंडे गळून पडत आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च देखील निघणे अवघड झाले आहे. त्यामुळे या नुकसानीचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

पावसाने भिजून सोयाबीनची प्रतवारी घसरली तर बाजारात कमी भाव मिळेल, या भीतीने शेतकरी मिळेल त्या भावात मजुरांकडून सोयाबीन सोंगणी करून घेत आहेत. तालुक्यात एकरी २२०० ते २३०० रुपयापर्यंत सोयाबीन सोंगणी तर गंजी लावण्याचा वेगळा खर्च करावा लागत आहे. सुरुवातीला सोयाबीन बियाणे बोगस निघाल्याने दुबार तिबार पेरणी करावी लागली, तर आता सोयाबीन काढणीच्या वेळी परतीचा पाऊस मुक्काम ठोकून बसला आहे.

अमरावती जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी संत्र्याला गळती लागली असून अतिपावसाने कपाशी ओली होऊन वाया गेली. तर तूर आणि हरभरा या पिकांवर बुरशीजन्य रोगाचा धोका असल्याने शेतकऱ्याचे अस्मानी संकटामुळे कंबरडे मोडले आहे.

अतिपावसाने सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटले आहेत. सोयाबीन सोंगणीला आले असताना पावसाची हजेरी लावणे सुरूच असल्याने सोयाबीन काढणेही कठीण झाले आहे. सोयाबीन, उडीद, मुग हे शेतकऱ्यांचे नगदी पीक आहे, परंतु त्यानेही या वर्षी अपेक्षाभंग केला. अतिपावसामुळे तूर व कापाशीही धोक्यात आली आहे.

यवतमाळ जिल्ह्य़ात यंदा प्रारंभापासून पावसाचा जोर कायम आहे. पीक काढणीला आले तरी पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही अशी स्थिती आहे. मूग आणि उडीद पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. आता सोयाबीन काढणीला आले आहे. या सुमारास बरसत असलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

सोयाबीनला उतारा कमी झाला आहे. त्यातही हातात पडणारे सोयाबीन ओलेचिंब झाले आहे. यामुळे पांढरी बुरशी पडून सोयाबीन कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सोयाबीनच्या गंज्यांमधून वाफा निघत आहेत. काळवंडलेले सोयाबीन हातात पडल्याने शेतकरी हादरले आहेत. कापूस वेचणीसाठी गावामध्ये मजूरच मिळत नाही. यातून कापसाचेही नुकसान होत आहे. पावसाचे बोंड सडून शेतकऱ्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे.

भाजीपाला आणि फुलपिकांना देखील पावसाचा मोठा फटका बसला आहे. यावर्षी विजयादशमीला झेंडूची फुले विक्रीसाठी येणार नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तर भाजीपाला उत्पादनाला पावसाने मोठय़ा प्रमाणात मार बसला आहे. बुलढाणा, अकोला आणि वाशीम जिल्ह्य़ातही हीच स्थिती असून परतीच्या पावसाने शेकडो हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे सर्वेक्षण सुरू झाले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पेरणीचा खर्च निघणे कठीण

सोयाबीन पेरणीला एकरी लागणारा खर्च तर झालेले उत्पन्न पाहता पेरणीचा खर्च निघणेही कठीण झाले आहे. पेरणीसाठी नांगरणी ६०० रुपये, वखरणी ३०० रुपये, सोयाबीन बियाणे एक गोणी २२०० रुपये, पेरणी ५०० रुपये, खत १ हजार, फवारणी ३ हजार, डवरणी ५०० रुपये, युरिया २७० रुपये, काढणी २३०० रुपये, मळणी – २०० रुपये प्रति गोणी असा एकूण एकरी खर्च होत आहे. तर उत्पन्न चार ते पाच क्विंटल होत आहे. बाजारात सोयाबीनला प्रति क्विंटल ३ हजार ते ३९०० रुपयेपर्यंत भाव मिळत आहे. अतिपावसामुळे एकीकडे सोयाबीनची प्रत खालावली आहे, दुसरीकडे एकरी उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत उत्पादन खर्च निघणार की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना आहे.