जिल्ह्यातील गारपीटग्रस्त गावांच्या पाहणीस आलेल्या केंद्रीय पथकाने गुरुवारी सेलू तालुक्यातील दिग्रस व झोडगाव या गावांना भेटी दिल्या.
दिल्लीच्या नियोजन आयोगाचे रामानंद व भारतीय अन्न महामंडळाचे विनोद सिंग यांचे हे पथक पाहणीस आले होते. जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक दिवेकर आदींसह अधिकारी व कर्मचारी यात सहभागी झाले होते. दिग्रस येथे रामनाथ विष्णू पौळ व कडाजी इक्कर या शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी देऊन पथकाने पाहणी केली. या वेळी गावचे शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांनी पथकासमोर ज्वारीची कणसे, नष्ट झालेल्या गव्हाच्या ओंब्या आदींसह झालेले नुकसान दाखविले. या नुकसानीतून सावरण्यासाठी विशेष पॅकेज द्यावे, बँकांचे कर्ज माफ करावे. नुकसानीमुळे शेतकऱ्यांना व शेत मजुरांनाही शेतात कामे राहिली नाहीत. त्यामुळे रोजगार हमी योजनेतून ही कामे करावीत, कापूस उत्पादकांनाही मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. पथकाने रामेश्वर पौळ, उद्धव पौळ, धोंडीराम पौळ, चक्रधर पौळ आदी शेतकऱ्यांशी संवाद साधला. दिग्रसहून पथक झोडगावला रवाना झाले. उद्या (शुक्रवारी) पथक सोनपेठ, मानवत आदी तालुक्यांतील गावांना भेटी देणार आहे.