कासा : आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गावठी हातबॉम्बचा हल्ला केल्याची घटना कासा परिसरात उघडकीस आली आहे. संतोश शेंडे (वय ३७) असे या व्यक्तीचे नाव असून त्याला मंगळवारी दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली.

संतोष शेंडे याचा घटस्फोट झाला होता. त्याच्या पत्नीने पोटगीसाठी दावा दाखल केला होता. या दाव्यात नारायण बेंडगा हा संतोष शेंडे याचा जामीनदार होता. मात्र बेंडगा याने न्यायालयातून जामीनपत्र अचानक काढून घेतल्याच्या रागात शेंडे याने त्याच्यावर १८ डिसेंबर रोजी कोयत्याने हल्ला केला.

याप्रकरणी विक्रमगड पोलीस ठाण्यात शेंडे याच्याविरोधात बेंडगा यांनी तक्रार नोंदवली होती. त्यानुसार आरोपी शेंडे याला अटक करण्यासाठी पोलीस त्याच्या घरी गेले असता त्याने गावठी बॉम्बने पोलिसांवर हल्ला केला. घराच्या बाजूने जाणाऱ्यांवरही त्याने गावठी बॉम्ब फेकले.

या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलिसांनी दहशतवाद विरोधी पथक व बॉम्ब शोधक पथकाला पाचारण केले. मंगळवारी या दोन्ही पथकांनी संयुक्तरीत्या सापळा रचून शेंडे याला त्याच्या घरातून अटक केली. आरोपी शेंडे याच्याविरुद्ध स्फोटक पदार्थ अधिनियमासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.