शेतकऱ्याच्या विचारणेने पारा चढला

वाशीम जिल्ह्य़ातील गारपिटीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी आलेले परिवहन मंत्री व शिवसेनेचे नेते दिवाकर रावते शेतकऱ्यांवरच रागावल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. रिसोड तालुक्यातील नेतन्सा येथे दिवाकर रावते पाहणी करीत असताना शेतकऱ्यांमधून ‘मदत केव्हा देणार?’ असा प्रश्न आला. त्यावर दिवाकर रावते यांचा पारा चढला व त्यांनी गारपीटग्रस्त शेतकऱ्यांची समजूत काढण्याऐवजी त्यांना ‘मदत जाहीर होताच ती घेऊन तुमच्या दारात उभा राहू का?’ अशा शब्दात खडेबोल सुनावले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

वाशीम जिल्ह्यात तीन दिवस जोरदार गारपीट  झाली. या गारपिटीत गहू,  हरभरा, कांदा, भाजीपाला  व फळपिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते शुक्रवारी जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले  होते.

या दौऱ्यात रिसोड तालुक्यातील कोयाळी गावाचा समावेश होता. त्याठिकाणच्या बांधावरूनच दिवाकर रावते जात असताना तालुक्यातील शेतकरी व शिवसैनिकांनी त्यांना नेतन्सा शिवारातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याची विनंती केली. त्यावरून ते नेतन्सा येथे दाखल झाले. या ठिकाणी शेतकऱ्यांनी ‘मदत कधी देणार?’ अशी विचारणा करताच दिवाकर रावते संतप्त झाले. ‘मदत काल जाहीर झाली, म्हणजे काय दरवाज्यात लगेच येते का?, जास्त बोलायचे नाही, काही तर भान ठेवा’ अशा शब्दात रावतेंनी शेतकऱ्यांना चांगलेच सुनावले. दिवाकर रावतेंचे खडेबोल ऐकून शिवसेनेचे पदाधिकारी देखील अचंबित झाले, तर मंत्र्यांचे वक्तव्य ऐकून शेतकऱ्यांनाही धक्का बसला. या घटनेची चित्रफित सुद्धा व्हायरल झाली आहे. दिवाकर रावते यांच्या वक्तव्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.