राज्यात अनेक भागात दमदार पाऊस झाला असताना दुर्दैवाने सोलापूर जिल्ह्य़ात मात्र कमीच पाऊस झाला आहे. मोहोळ, मंगळवेढा भागात तर तुलनेने पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे पीकपाण्याचा प्रश्न भेडसावत असल्याच्या पाश्र्वभूमीवर मंगळवेढा तालुक्यातील सलगर बुद्रूक येथे गावकऱ्यांनी वरूणराजाला प्रसन्न करण्यासाठी गाढवाचा लग्न सोहळा पार पाडला आहे.

मंगळवेढा परिसरात सतत दुष्काळाची छाया आहे. सलगर बुद्रूक येथे तर गेल्या सलग चार वर्षांपासून पाऊसच नसल्यामुळे दुष्काळाचे संकट कायम राहिले आहे. येथील शेती पावसावरच विसंबून आहे. जलसिंचनाची कोणतीही सुविधा नाही. यंदाच्या वर्षी पाऊसमान चांगले असल्याचे अनुमान काढले जात असताना मंगळवेढा तालुकावासीयांच्या विशेषत: सलगरकरांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु पावसाने चांगलीच दडी मारली. त्यामुळे हतबल झालेल्या ग्रामस्थांनी शिवारात पाऊस पडावा आणि दुष्काळाचे संकट दूर व्हावे, यासाठी वर्गणी काढून गाढवाचे लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे गावातील मारूती मंदिरासमोर गाढवाचे लग्न लावण्यात आले.

या लग्नसोहळ्यासाठी सलगर गावात गाढवच नसल्यामुळे बाहेरगावातून गाढव आणण्यात आले. प्रथम गाढवांना कळसात आंघोळ घालण्यात आली. त्यानंतर पाठीवर नवीन वस्त्रे घालून मारूती मंदिराकडे पारण्याला वाजत-गाजत नेण्यात आले. त्यानंतर बाशिंग बांधून गाढव वधू-वरास मंदिरासमोरील पिंपळाच्या झाडाखाली विवाह सोहळा लावण्यात आला. मंगलाष्टका म्हटल्या गेल्या. नंतर वाजंत्रीसह गाढव वधू-वरांस सजवून गावातून वरात काढण्यात आली. गाढवाचा लग्न सोहळा आणि वरात पाहण्यासाठी अख्खे गाव लोटले होते. सर्वाना भोजन देण्यात आले. नंतर शेवटी समस्त गावकऱ्यांनी शिवारात पाऊस पडावा म्हणून गाढवाचे पाय धरले.