बारामतीकरांना संमेलनाच्या स्मृती
बारामती येथील नाटय़संमेलनाचे सूप वाजेल, तेव्हा संमेलनास उपस्थित असलेल्या नाटय़रसिकाच्या घरी बारा जिन्नस देऊन या संमेलनाच्या स्मरण ठेवले जाणार आहे. यामध्ये देखील संयोजकांनी १२-१२-१२ चा योग जुळवून आणला आहे.
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा वाढदिवस आणि १२-१२-१२ ही शतकातून एकदाच येणारी अनोखी तारीख हा दुहेरी योग साधून ९३ वे अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलन बारामती येथे होणार आहे. संमेलनास उपस्थित राहणाऱ्या रसिकांनी देखील बारा जिन्नस घरी घेऊन जात या संमेलनाची स्मृती जपावी यासाठी संयोजकांनी कंबर कसली आहे. संमेलनाचा समारोप होताना रसिकांना या बारा गोष्टी देण्याचा मानस आहे.

संमेलनाचे संयोजक आणि नाटय़ परिषदेच्या बारामती शाखेचे अध्यक्ष किरण गुजर म्हणाले, या संमेलनास उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक नाटय़रसिकाला स्मृतिचिन्ह आणि स्मरणिका देण्यात येणार आहे. तसेच श्रीखंड, पनीर, चीज आणि बटर ही दूध संघाची उत्पादने, डाळिंब व बाजरी ही मार्केट समितीची उत्पादने, साखर कारखान्यातर्फे दोन किलो साखर, साईचा गूळ, काकवी, मशरूम, डायनॅमिक डेअरीची ज्युस व इनसोफर कंपनीची चॉकलेट्स ही बारा उत्पादने देण्यात येणार
आहेत.    

या नाटय़संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. मोहन आगाशे हे शुक्रवारी (२१ डिसेंबर) सकाळी कोलकता येथून पुण्यास येणार असून दुपारनंतर ते बारामतीला येणार आहेत. नाटय़ परिषदेच्या नियामक मंडळाचे सदस्य सुनील महाजन यांच्याकडे त्यांना बारामतीला घेऊन जाण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. बारामती येथे सायंकाळी सात वाजता डॉ. मोहन आगाशे यांची भूमिका असलेल्या ‘काटकोन त्रिकोण’ या नाटकाचा प्रयोग होणार आहे.