एकनाथ खडसेंची खदखद

भाजप-सेना युती राज्यात सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचे प्रमुख दावेदार मानले गेलेले एकनाथ खडसे काही वर्षांपासून अडगळीत पडल्यासारखे आहेत.

जमीन खरेदी प्रकरणावरून मंत्रिपदही गेल्यानंतर तर त्यांच्यावर राजकीय विजनवासात राहण्याची वेळ आली. यथावकाश त्यांना पक्षानेही निर्दोष ठरविले, पण पक्षाकडून सन्मानाची वागणूक काही मिळाली नाही. त्याचे दु:ख मनात ठेवून ते पक्षश्रेष्ठींविषयी संधी मिळेल त्या ठिकाणी नाराजी व्यक्त करीत असतात. मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहिले म्हणूनच आपल्याला बाहेर ठेवण्यात आले, अशी वेदना खडसे यांनी नुकतीच एका कार्यक्रमात व्यक्त केल्याने खडसेंची खदखद अजून कायमच आहे.

खासदार असलेल्या स्नुषा रक्षा खडसे यांची राजकीय कारकीर्द धोक्यात येण्याच्या भीतीने त्यांनी दुसऱ्या पक्षात जाण्याचे पाऊल उचलण्याची जोखीम पत्करली नाही. पक्षाकडून लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत पाहिजे तेवढे महत्त्व दिले जात नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांच्या मनात असलेली खदखद काही ना काही कारणांनी बाहेर निघतच आहे. भुसावळ शहरातील नाहाटा महाविद्यालयात आयोजित गुरुनाथ फाऊंडेशनच्या कार्यक्रमात त्याचा पुन्हा प्रत्यय आला.