जिल्ह्यातील चांदूर बाजार, अचलपूर, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, चिखलदरा, धारणी, वरूड, मोर्शी या तालुक्यांना रविवारी अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसला. या पावसामुळे गहू, हरभरा पिकाचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले असून दर्यापूर तालुक्यातील नायगाव येथे शेतात वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने करावेत, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

रविवारी सकाळपासूनच जिल्ह्यात सर्वदूर ढगाळ वातावरण होते. अमरावती शहरातही पावसाच्या सरी आल्या. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका चांदूर बाजार, अचलपूर, मोर्शी या तालुक्यांना बसला. या गारपिटीने संत्र्याच्या बागांसह आंब्याच्या मोहराचे मोठे नुकसान झाले आहे. संत्र्याच्या आंबिया बहराला या गारपिटीमुळे नुकसान पोहचले असून मृगबहाराच्या संत्र्याची गळती होण्याची शक्यता आहे. अनेक भागात हरभरा पिकाची सध्या काढणी सुरू आहे. मात्र, शेतातच गहू आणि हरभरा भुईसपाट होताना शेतकऱ्यांना पहायला मिळाला. कपाशीवरील बोंडअळीच्या प्रादुर्भावाने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर गारपिटीने नवीन संकट उभे केले आहे. दर्यापूर तालुक्यातील नायगाव येथे शेतात हरभऱ्याची गंजी झाकण्यासाठी गेलेल्या गंगाधर कोकाटे (६०) यांचा वीज पडून मृत्यू झाला. दर्यापूर आणि  अंजनगाव सुर्जी तालुक्यात सकाळी साडेआठ वाजतापासून पावसासह गारपीट झाली. त्यामुळे हरभरा, कांदा, संत्रा, केळी, लिंबूसह पानपिंपरी आणि पानमळ्याचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यातील भूगाव, मेघनाथपूर, बोरगाव, नायगाव, बोरगाव, चमक, देवरा, शिंदी, पोही, रासेगाव, इसेगाव, करजगाव, आसेगाव बाजार, हिवरखेड, शिरजगाव बंड इत्यादी गावांमध्ये गारपिटीमुळे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. नुकसानीची माहिती मिळताच अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी दुपारीच शेतांमध्ये जाऊन पाहणी केली. त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्याची मागणी त्यांनी केली.

पालकमंत्री प्रवीण पोटे हे नागपूर दौऱ्यावर जात असताना वाटेत नुकसान झालेल्या शेताची पाहणी त्यांनी केली. जिल्हा प्रशासनाने विमा कंपन्यांची बैठक घेऊन गावनिहाय आकडेवारी उपलब्ध करून द्यावी, या नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाले आहे, त्यातील कोणीही मदतीपासून वंचित राहता कामा नये, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, अशी सूचना प्रवीण पोटे यांनी केली.