सामूहिक मुंडण करून शासनाचा निषेध

अकोला : खामगाव तालुक्यातील अकोली येथील एका शेतकरी पुत्राने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेनंतर गावकऱ्यांनी सामूहिक मुंडण करून शासनाचा निषेध केला. प्रवीण ज्ञानेश्वर मुजुमले (१८) असे मृत मुलाचे नाव आहे.

अकोली हे गाव सन २०११ पासून दुष्काळग्रस्त आहे. शासनाकडून गावात कोणतीही दुष्काळी कामे न झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून अकोली येथील एकुलता एक असलेल्या प्रवीण मुजुमले याने २७ फेब्रुवारीला शेतात गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या कुटुंबात चार एकर शेती आहे. कर्जाच्या डोंगरामुळे प्रवीण हताश झाला होता. परिस्थितीत बदल होत नसल्याने त्याने अखेर आपली जीवनयात्रा संपवली. त्याच्या पश्चात आईवडील, सहा बहिणी व आजी असा आप्तपरिवार आहे.

अकोली येथील ग्रामस्थांनी शासनाचा निषेध म्हणून १ मार्चला सामूहिक मुंडण केले. यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करून रोष व्यक्त करण्यात आला. माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी अकोली येथे जाऊन मुजुमले यांच्या परिवाराचे सांत्वन केले. सरकारच्या साडेचार वर्षांच्या काळात शासनाच्या नाकर्तेपणामुळे राज्यात १८ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तरीही शासनाला जाग आली नाही. या सरकारने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिली नाही. भाजप सरकार हे शेतकरी विरोधी असल्याचा आरोप दिलीपकुमार सानंदा यांनी केला. मृत प्रवीण मुजुमले यांच्या परिवारातील एका सदस्याला शासनाने शासकीय नोकरी द्यावी व त्याच्या परिवाराला ४० लाख रुपयांची आर्थिक मदत मिळावी आदी गावकऱ्यांनी केलेल्या मागणीला त्यांनी पाठिंबा दिला. प्रवीण मुजुमले यांच्या बहिणीच्या लग्नाची जबाबदारी दिलीपकुमार सानंदा यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीने सामूहिकरित्या उचलून कुटुंबाला दिलासा दिला.