अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर मच्छीमार, बागायतदार, शेतकऱ्यांनी जैतापूर प्रकल्पाच्या विरोधात रविवारी मागणी मोर्चा छेडला. या मोर्चामध्ये मोठय़ा संख्येने सहभागी झालेल्या ग्रामस्थांनी पर्यावरणघातक असलेला जैतापूर प्रकल्प रद्द करावा, बराक ओबामा यांनी प्रकल्पाच्या पाश्र्वभूमीवर कोणताही अणुकरार करू नये, अशी जोरदार मागणी केली. या वेळी या मागणीत लहान मुलांचा असलेला सहभाग लक्षवेधी होता. तालुक्यातील माडबन येथे उभारल्या जात असलेल्या जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला प्रकल्पग्रस्तांचा विरोध असून वेळोवेळी छेडलेल्या विविध आंदोलनांच्या माध्यमातून त्यांनी प्रकल्पाच्या उभारणीला असलेला विरोध दाखवून दिला आहे. तरीही शासनाकडून प्रकल्पाची उभारणी केली जात आहे. अशा स्थितीमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे रविवारी भारत दौऱ्यावर आगमन झाले. त्यांच्या दौऱ्यामध्ये प्रकल्पाच्या अनुषंगाने अणुकरार वा चर्चा होण्याची शक्यता आहे. त्या पाश्र्वभूमीवर श्री. ओबामा यांचे लक्ष वेधणे आणि या प्रकल्पाच्या उभारणीला लोकांचा विरोध असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देण्याच्या उद्देशाने आज साखरीनाटे येथे मागणी मोर्चाचे आंदोलन छेडण्यात आले. साखरीनाटे येथील तबरेज साहेकर चौकापासून बाजारपेठ अशी भव्य अशी या वेळी रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये आमदार श्री. साळवी, मच्छीमार नेते अमजद बोरकर, प्रकल्पविरोधी जनहक्क समितीचे उपाध्यक्ष मन्सूर सोलकर, समितीचे सचिव तथा पंचायत समिती सदस्य दीपक नागले, साखरीनाटेचे सरपंच तौफिक सोलकर, मजीद गोवळकर, संतोष चव्हाण यांच्यासह मोठय़ा संख्येने मच्छीमार बांधव, शेतकरी, बागायतदार सहभागी झाले होते. भव्य रॅलीनंतर तबरेज साहेकर चौकामध्ये सभा झाली. या वेळी बोलताना आमदार श्री. साळवी यांनी जैतापूर प्रकल्पाच्या उभारणीला शिवसेनेचा कायमच विरोध राहिला असून प्रकल्प रद्द होईपर्यंत शिवसेना प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी राहणार असल्याचे स्पष्ट केले. मच्छीमार नेते श्री. बोरकर यांनी बोलताना मागणी मोर्चा आंदोलन छेडण्यामागची भूमिका स्पष्ट केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष श्री. ओबामा यांच्या आगमनाला विरोध नसून त्यांच्या उपस्थितीमध्ये एखादा अणुकरार होणार असेल, तर प्रकल्पाच्या उभारणीला लोकांचा विरोध असल्याचा संदेश त्यांच्यापर्यंत  पोहोचविण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. जैतापूर प्रकल्प रद्द करावा, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली. या मोर्चाच्या पाश्र्वभूमीवर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधाच्या पाश्र्वभूमीवर रविवारी काढण्यात आलेल्या मागणी मोर्चामुळे तालुक्यातील नाटे बाजारपेठ आज बंद ठेवण्यात आली होती, त्यामुळे बाजारपेठेमध्ये रविवारी शुकशुकाट पसरला होता.