दोन महिन्यांपासून पावसाचा पत्ता नाही. जनावरांना चारा नाही, प्यायला पाणीही नाही. किडूकमिडूक विकून महागडे बियाणे खरेदी करीत पेरणी केली. परंतु आलेले पीक पावसाअभावी करपून गेले.. केंद्रीय दुष्काळ निवारण आयुक्त राघवेंद्र सिंग यांच्यापुढे शेतकऱ्यांनी या शब्दांत आपली व्यथा मांडली.
पाडळसिंगी, मादळमोही येथे केंद्रीय दुष्काळ निवारण आयुक्तांच्या पथकाने मंगळवारी भेट दिली. कुंभारवाडी शिवारात शेतीची पाहणी करण्यात आली. राघवेंद्र सिंग यांनी कापूस, सोयाबीन पिकांची पाहणी केली व शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. पाऊस नसल्यामुळे पिकेकरपून गेल्याचे पथकाने पाहिले. कुंभारवाडी परिसरातील राधाकिसन जाधव या शेतकऱ्याने आयुक्तांपुढे आपली व्यथा मांडताना गुरांना चारा नाही, प्यायला पाणी नाही. पेरलेले पीक करपून गेले, असे सांगितले. अन्य शेतकऱ्यांनीही आयुक्तांशी बोलताना पेरणीसाठी आणलेल्या बियाण्यांच्या पिशव्या दाखवल्या.
जूनच्या पहिल्या आठवडय़ात झालेल्या पावसावर पेरणी केली. त्यानंतर आणखी पाऊस पडेल आणि पेरणी करू या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांवर पावसाअभावी पेरणीची वेळच आली नाही, ही बाबही निदर्शनास आणून दिली. काही शेतकऱ्यांनी कापूस लागवड करण्यात आली, परंतु पीक उगवलेच नाही हे दाखवून दिले. निसर्गाची अवकृपा झाली असताना प्रशासकीय अधिकारीही साधा पीक पेरा लिहून घेण्यासाठी पशांची मागणी करतात, असे गाऱ्हाणेही शेतकऱ्यांनी मांडले.
दोन ठिकाणी १०-१२ मिनिटे शेतकऱ्यांच्या व्यथा पथकाने जाणून घेतल्या. दुष्काळाची तीव्रता गंभीर असून या संदर्भात पीकपाहणी अहवाल सादर करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, आमदार लक्ष्मण पवार आदींची उपस्थिती होती.