News Flash

संत्र्याचे भाव कोसळल्यामुळे शेतकरी हवालदिल

अतिपावसामुळे फळांवर काळे व पिवळे डाग पडून फळे मोठय़ा प्रमाणात गळून पडली होती

अमरावती : संत्र्याला भाव नसल्याने जिल्ह्यातील संत्रा उत्पादक पुन्हा चिंतेत सापडले आहेत. ५० रुपये किलो असलेल्या संत्र्याचा दर केवळ १२ ते १५ रुपये प्रतिकिलोवर आला असून २०० रुपये कॅरेटने शेतकऱ्यांची संत्री विकली जात असल्याचे चित्र आहे .

या वर्षी अतिपावसामुळे जुलै ते सप्टेंबर या कालावधीत संत्री बागांमध्ये मोठय़ा प्रमाणात फळगळ झाली त्यामध्ये संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले, त्या संकटावर मात करून शिल्लक राहिलेल्या संत्रा फळावर लाखो रुपये खर्च करून विविध फवारण्या व उपाययोजना करून फळांची शेतकऱ्यांनी योग्य जपणूक करून त्यांना टिकवून ठेवले. मात्र अचानक आता संत्र्याला भाव मिळत नसल्याने मोर्शी आणि वरूड तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी पुन्हा चिंतेत सापडले आहेत. ५० रुपये किलो असलेल्या संत्र्याचा दर केवळ १२ ते १५ रुपये प्रतिकिलोवर आला आहे.

मोर्शी आणि वरूड तालुक्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर संत्री बागा आहेत. टाळेबंदीमुळे सर्वत्र वाहतूक बंद होती. शेतकऱ्यांकडे मोठय़ा प्रमाणात संत्री असूनदेखील संत्र्याला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले. यावर्षी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले. यावर्षी आंबिया बहराची फूट चांगली झाली होती. मात्र, जुलै ते ऑगस्ट महिन्यात संत्री बागांमध्ये मोठय़ा प्रमाणात गळ झाली. ३५ ते ५० टक्के संत्री गळून पडली. त्यामुळे संत्री उत्पादक शेतकरी कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर आहे.

मध्यंतरी अतिपावसामुळे फळांवर काळे व पिवळे डाग पडून फळे मोठय़ा प्रमाणात गळून पडली होती. त्यातून वाचलेल्या संत्र्यालाही भाव नसल्याने संत्रा बागायतदारांची कोंडी झाली आहे. सध्या संत्र्याला १२०० ते १५००  रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे.  यंदा आंबिया बहाराचे उत्पादन चांगले होण्याची आशा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना होती. संत्रा उत्पादनाला चांगला भाव मिळून पैसा हातात येईल, या आशेवर असलेला शेतकरी भीषण दुष्काळ, टोळधाड, संत्री फळगळती, संत्रा झाडाची पानगळ, करोना, या सर्व संकटांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 2, 2020 12:24 am

Web Title: farmers worried over falling orange prices zws 70
Next Stories
1 Coronavirus : राज्यातील करोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ
2 Coronavirus : राज्यात आज ५ हजार ३६९ नवे रुग्ण; ३ हजाराहून अधिक करोनामुक्त
3 “लोकांना काय वाटतं, यापेक्षा आम्हाला काय वाटतं, यावरच ठाकरे सरकारचा भर”
Just Now!
X