साक्री तालुक्यातील पानखेड डोंगर परिसरात वन जमिनीवर अतिक्रमण करणारे आदिवासी आणि वन विभागाच्या पथकामध्ये जोरदार संघर्ष उडाला. सुमारे अडीचशे लोकांच्या जमावाने धक्काबुक्की केल्याने वन विभागाच्या पथकाला पळ काढावा लागला. या घटनेनंतर पिंपळनेर पोलीस ठाण्यात १० जणांसह जमावाविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शुक्रवारी पानखेडे डोंगराजवळील वन जमिनीवर अतिक्रमण केले जात असल्याचे लक्षात आल्याने वन विभागाच्या पथकाने काही लोकांना हटकले. जमीन खेडणाऱ्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला. यातून वन विभागाचे कर्मचारी आणि आदिवासींमध्ये वादावादी सुरू झाली. यावेळी सुरूपसिंग मालचे, विश्वास ठाकरे, बळीराम मालचे, महारू गायकवाड, चंदू राऊत, नथु वारूडे, पंडित कुंवर, उत्तम कुंवर, रोडय़ा कुंवर, बळीराम वन्या यांच्यासह सुमारे २०० हून अधिक लोकांचा जमाव एकत्र आला. जमावाने वन विभागाच्या कारवाईला विरोध करत गोंधळ घातला. यामुळे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना काढता पाय घ्यावा लागला. पिंपळनेर येथील राहुल बोर्डे यांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार नोंदवली