सावंतवाडी शहरात नगर परिषद या हंगामात पाच हजार झाडांचे वृक्षारोपण करणार आहे. ही सुमारे २५ जाती प्रकाराची झाडे आहेत. जुस्तीननगर भागात देवराई निर्माणदेखील करण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे. देवराई संकल्पनेवर घाला घातला जात असतानाच नगर परिषद जैवविविधतेचे संवर्धन करणार आहे. नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्ष राजन पोकळे आणि नगर परिषदेचे सर्व नगरसेवकांनी मिळून सावंतवाडी शहराचा विकास ‘मॉडेल सिटी’च्या पाश्र्वभूमीवर सुरू केला आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांची यासाठी प्रेरणादेखील त्यांना मिळाली आहे. सावंतवाडी मोती तलाव आणि नरेंद्र डोंगर सावंतवाडी शहराच्या वैभवात भर घालत आहे. या शहरात सावंतवाडी संस्थानचे अधीपती श्रीमंत बापूसाहेब महाराज आणि श्रीमंत शिवराजराजे भोसले यांनी वैशिष्टय़पूर्ण वृक्ष लागवड केली होती. त्यांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न झाला होता. सावंतवाडी नगर परिषदेने गेली पाच वर्षे शहरवासीयांना झाडांचे वाटप केले पण काहींनी ही झाडे शहरात लावण्याचे टाळत आपापल्या गावी लावली, त्यामुळे नगराध्यक्ष बबन साळगावकर व उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी यंदा पाच हजार झाडे नगर परिषदेने वृक्षारोपण करून द्यायचा निर्णय घेतला आहे. शासनाने प्रत्येक प्रभागात २५ झाडे लावण्याचा निर्णय घेतला, त्यानुसार शहरात ४२५ झाडे लावली जातील पण नगर परिषदेने पाच हजार झाडे लावण्याचा निर्णय घेतला. जुस्तीननगरमध्ये देवराई निर्माण करून तेथे वड, पिंपळ, आंबा, कोकम अशी वैशिष्टय़पूर्ण झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे. सावंतवाडी शहरात देवराईची संकल्पना निर्माोण करण्याचा नगर परिषद निर्णय जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. शहराचा नगरपक्षी भारद्वाज तर वन्यप्राणी मुंगूस असल्याचे जाहीर करून आता देवराईची संकल्पना साकारण्याचा निर्णय घेतला आहे असे सांगण्यात आले. सावंतवाडी शहराला सोनचाफा, वड, जांभूळ, कोकम, जायफळ अशा वैशिष्टय़पूर्ण १५ जातीच्या/ प्रकाराच्या झाडांचे नव्याने वृक्षारोपण करण्यात येणार आहे. त्यासाठी नगर परिषदेने स्वत:ची वृक्षवाटिका निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगण्यात आले. सावंतवाडीच्या सिमेंट काँक्रीटच्या जंगलात जैवविविधता, पक्षी व प्राणिसंवर्धन आणि नैसर्गिक पाणी अशावर भर देण्याचा नगर परिषदेचा प्रयत्न निश्चितच शहराचा लौकिक वाढविणारा ठरेल असे नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले.