फटाके फोडून ताडोबाच्या दिशेने परत पाठवले

चंद्रपूर : चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र परिसरात पाच वाघांचे अस्तित्व असून आज रविवारी सकाळी आठ वाजता एकाच वेळी तीन वाघ ग्रामस्थांना दिसले. चंद्रपूर वन विभागाच्या पथकाने फटाके फोडून या वाघांना ताडोबाच्या दिशेने परत पाठवले. दरम्यान, या वाघांचे वीज केंद्र परिसरात वारंवार येणे अतिशय धोक्याचे ठरू शकते.

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राला लागून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे. त्यामुळे या परिसरात नेहमीच वाघ, बिबट, अस्वल, हरण, चितळ यासह बहुतांश वन्यप्राणी ये-जा करीत असतात. दोन वर्षांपूर्वी वीज केंद्रातच बिबटय़ाला जेरबंद करण्यात आले होते. अस्वल तर नेहमीच या भागात फिरत असते. आज सकाळी पुन्हा वीज केंद्र परिसरात तीन वाघ ग्रामस्थांना दिसले. या घटनेची माहिती चंद्रपूर वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांना कळवण्यात आली. माहिती मिळताच थिपे घटनास्थळी दाखल झाले. वाघांचा शोध सुरू असतानाच विचोड गावाजवळच्या एका शेतात वाघाने म्हशीला ठार केल्याचे कळले. त्यामुळे वाघ त्याच परिसरात असल्याची खात्री झाली. यावेळी वाघाच्या पावलांचे ठसे सुद्धा सर्वत्र दिसून आले.

यावेळी थिपे यांच्यासह वन खात्याच्या १५ कर्मचाऱ्यांनी  फटाके फोडून वाघांना मागे फिरण्यास बाध्य केले. सकाळी आठ वाजतापासून सुरू झालेली ही मोहीम सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू होती.