04 March 2021

News Flash

 कास पठार फुलले.. पण पर्यटकांना बंदी

पावसाळा सुरू झाला, की उन्हाने गवताची वैराण झालेल्या कासच्या पठारावर जीवसृष्टी बहरायला सुरुवात होते

विश्वास पवार, लोकसत्ता

वाई : कास पठारावर दुर्मीळ फुलांचा बहर सुरू झालेला असतानाच दुसरीकडे पर्यटकांना मात्र येथे प्रवेशबंदी आहे. येथील कुंपणं पूर्णपणे बंद करण्यात आली असून, या भागाला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे.

पावसाळा सुरू झाला, की उन्हाने गवताची वैराण झालेल्या कासच्या पठारावर जीवसृष्टी बहरायला सुरुवात होते. जूनच्या पहिल्या पावसापासून पठार हिरवेगार होते. ऑगस्टच्या अखेरीस सर्व प्रकारची फुले थोडय़ा प्रमाणात यायला सुरुवात होते. पावसाची संततधार व धुक्याची दाट चादर कमी झाल्याने, उन वाढल्याने पठार विविधरंगी फुलांनी बहरले आहे.सद्य:स्थितीत लाल रंगाचा तेरडा, कीटकभक्ष्यी निळी सीतेची आसवे, पांढरे चेंडच्या आकारासारखे गेंद, टूथब्रश, वायतुरा, पिवळी सोनकी, अबोलिमा, चवर (रानहळद), पंद, पांढरी तुतारी, आमरीचे विविध प्रकार आदी फुले पठारावर उमलली आहेत.

प्रतिबंधित क्षेत्र जाहीर

कास पठार कार्यकारी समितीकडून  कास पठारावर पर्यटकांच्या येण्यावर निर्बंध लादले असून पठारावर प्रवेश करू नये, अशा आशयाचे फलक ठिकठिकाणी लावले आहेत. पर्यटक आणि निसर्गप्रेमींसाठी पर्वणी असणाऱ्या कास पठारावर दरवर्षीप्रमाणे यंदाही दुर्मीळ आणि तितक्याच लक्षवेधी फुलांचा बहर आला आहे.  दरवर्षी सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ापासून पठार पर्यटकांसाठी खुले केले जाते; पण यंदा मात्र हे चित्र काहीसे वेगळे आहे. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक पर्यटनस्थळे बंद असल्यामुळे कास पठाराची परिस्थितीही काही वेगळी नाही.

गेल्या वर्षी हवामानातील बदलामुळे पठार फुललेले नव्हते. त्यामुळे पर्यटक येऊ शकले नाहीत आणि या वर्षी पठारावरील जैवसंपदा बहरली आहे; परंतु करोना संसर्गामुळे पर्यटन बंद असल्याने पर्यटकांसाठी पठार बंद आहे. यामुळे ग्रामस्थांचे आर्थिक स्रोत बिघडले आहे.    – सोमनाथ जाधव, सदस्य, कास पठार कार्यकारी समिती

या वर्षी कास पठार फुलले आहे. मात्र करोना संसर्गाच्या अनुषंगाने पर्यटनाला परवानगी नसल्याने पठारावरील निसर्गसौंदर्य या वर्षी पर्यटकांसाठी खुले नाही.

 रंजनसिंह परदेशी,  वनक्षेत्रपाल, मेढा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 5, 2020 3:27 am

Web Title: flowers of kaas plateau bloom in the bosom but tourists banned zws 70
Next Stories
1 रायगड किल्ला संवर्धनाची कामे रखडली..
2 ‘राज्यातील शाळा दिवाळीनंतर सुरू’
3 नालासोपाऱ्यात तरुणीची आत्महत्या
Just Now!
X