करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे यंदा देखील राज्यभरातील वारकऱ्यांना आषाढी एकादशी निमित्त लाडक्या विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाता आलेले नाही. तर, उद्या आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरात होणाऱ्या महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सपत्नीक पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. त्यानंतर आता बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले हे देखील पंढरपूरला जाण्यासाठी निघाले आहेत.

या पार्श्वभूमीवर अभिजीत बिचुकले यांनी माध्यमांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “तुम्हाला माहितीच आहे आणि मी सांगितलं होतं की आषाढी एकादशीला मी पंढरपूरला जाईल. तर, त्याप्रमाणे मी निघालो आहे. त्यांनी संपूर्ण नाकेबंदी केलेली आहे. परंतु भगवंताच्या मनात असेल, तर मी पोहचणार आहे. पण मी सांगू इच्छितो की एका बाजूला तुम्ही दारूची दुकाने उघडी ठेवत आहात, राजकीय मेळावे घेत आहात तिथं हजारो लोक येतात. मग पंढरपूरला माऊलीचं दर्शन घ्यायला सज्जन अशा वारकऱ्यांना तुम्ही का रोखलं आहे? म्हणजे इंग्रजांपेक्षा तुमचं राज्य वाईट वाटतं.”

तसेच, “दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या पंढरपूरमध्ये जी पूजा करतील, त्यांना मी एक सांगू इच्छितो की महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणून, पहिली पायरी जी असते ती चोखाबाची असते आणि चोखोबा जर उद्या पूजेला नसतील म्हणजे अभिजीत बिचुकले तर पूजा काय यशस्वी नाही असं माझं ठाम मत आहे.” असं देखील बिचुकले यांनी बोलून दाखवलं आहे.