दोन वर्षांत १३ जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा ठपका असलेल्या ‘टी-१’ या पाच वर्षांच्या वाघिणीला गोळ्या घालून ठार करण्यात आले. या वाघिणीच्या मृत्यूवरुन आता आरोप-प्रत्यारोपांची मालिकाच सुरु झाली आहे. रविवारी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी प्रश्नांची सरबत्ती करत राज्य सरकारला धारेवर धरले होते. विशेषत: वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर त्यांनी निशाणा साधला होता. आता मुनगंटीवार यांनीही मनेका गांधी यांना प्रत्युत्तर दिले आहे. मनेका गांधींनी केलेली टीका माहितीच्या अभावी असून वाघिणीला ठार करण्याचा निर्णय मंत्री किंवा सचिव घेत नाही. राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरणाच्या (एनटीसीए) मार्गदर्शिकेनुसार याबाबत निर्णय घेतल्याचे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे. मनेका गांधी यांचे वन्य प्राण्यांवर प्रेम आहे. त्या स्वत: महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री आहेत. वाघिणीच्या हल्ल्यात मृत झालेल्या महिलांचाही विचार मला करावा लागतो, अशा शब्दांत त्यांनी मनेका गांधी यांना टोला लगावला.

मनेका गांधी संतापल्या, ‘नरभक्षक’ वाघिणीची हत्या केल्याचा आरोप

मुनगंटीवार म्हणाले, पाच जणांचे बळी गेले, तेव्हाच त्या वाघिणीला पकडण्याचे आदेश दिले होते. काही प्राणिप्रेमींनी उच्च न्यायालयातून त्याला स्थगिती मिळवली. अखेर मृतांचा आकडा १३ वर गेला. वन विभाग वाघिणीचे शत्रू नाहीत. वन कर्मचारी जोखीम पत्कारुन वनाचे संरक्षण करतात.

वाघिणीला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला. परंतु, वाघिणीने उलटून हल्ला केला. तेव्हा नाईलाजाने तिला ठार करावे लागले, असे स्पष्ट केले. तसेच मुनगंटीवार यांनी शआफ़तअली खानवर केलेल्या आरोपांनाही त्यांनी उत्तर दिले. खान यांची १५ दिवसांपूर्वीच बिहार सरकारने नियुक्ती केली आहे. त्यांच्यावर जर गुन्हेगारीचे आरोप असतील तर मनेका गांधी या स्वत: केंद्रात मंत्री आहेत. त्यांनी वॉरंट काढून त्याला कारागृहात टाकावे, हे वनविभागाचे काम नाही, अशा शब्दांत त्यांनी मनेका गांधी यांना सुनावले. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याऐवजी पाच न्यायमुर्तींची उच्च स्तरीय समिती नेमावी. केंद्रीय मंत्र्यांना तो अधिकार आहे, असा सल्ला देण्यासही मुनगंटीवार विसरले नाहीत.

काय म्हणाल्या होत्या मनेका गांधी

अवनी या वाघिणीची ज्या निर्दयी पद्धतीने हत्या करण्यात आली, त्याचे मला अतीव दु:ख होत आहे. ही हत्याच आहे, हा गुन्हा आहे. अनेकांनी विनंती करुनही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या वाघिणीला ठार मारण्याचे आदेश दिले. असे करण्याची त्यांची ही पहिलीच वेळ नाही. आतापर्यंत त्यांनी तीन वाघ, शेकडो बिबटे आणि वन्य जिवांची हत्या केली आहे.

प्रत्येकवेळी ते हैदराबाद येथील नेमबाज नवाब शआफ़तअली खानचा वापर करतात. यावेळी खानने त्याच्या मुलालाही बरोबर घेतले होते. त्याच्या मुलाला हा अधिकार नाही. हे बेकायदा कृत्यच आहे. त्या वाघिणीला पकडण्याऐवजी एखाद्या नेमबाजाच्या हातून या वाघिणीची हत्या करण्यात आली आहे.

शआफ़तअली खानवर त्यांनी गंभीर आरोप केले. खानने आतापर्यंत ३ वाघिणी किमान १० बिबटे, काही हत्ती आणि ३०० हून अधिक जंगलातील प्राण्यांना मारले आहे. देशद्रोही लोकांना शस्त्रे पुरवणे आणि हैदराबाद येथील एका खून प्रकरणातील तो संशयित आरोपी आहे. तरीही सरकार त्यालाच नेहमी हे काम का देते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हे प्रकरण मी वरपर्यंत नेणार आहे, असेही त्या म्हणाल्या होत्या.