जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. गेल्या आठ दिवसांत िहगोलीची कयाधू नदी दोन वेळा दुथडी भरून वाहिली. जिल्ह्याच्या काही भागांत मात्र शेतकरी अजूनही चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. काही भागांतील शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी सुरू केली आहे.
गेल्या २४ तासांत पडलेल्या पावसाची बुधवारी सकाळी ८ वाजता घेतलेली नोंद मिमीमध्ये, कंसात आतापर्यंत पडलेला पाऊस : िहगोली ९३.२९ (१७६.०५), कळमनुरी ३३.५८ (८२.४२), सेनगाव २५.८३ (१७४.८२), वसमत २२.४३ (७५.१४), औंढा नागनाथ २२.२५ (९७.२५). िहगोली तालुक्यातील सिरसम बु. सर्कलमध्ये सर्वाधिक १५१, नर्सीनामदेव सर्कल १४८, तर डिग्रस सर्कलमध्ये सर्वात कमी ३५ मिमी पावसाची नोंद आहे. कळमनुरी तालुक्यातील कळमनुरी सर्कलमध्ये ४४, आखाडा बाळापूर सर्कल २४, सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव सर्कल २७६, आजेगाव सर्कल २१७, वसमत तालुक्यात आंबा सर्कल १५५, तर औंढा नागनाथ तालुक्यात जवळाबाजार सर्कलमध्ये एकूण १६७ मिमी पावसाची नोंद झाली.
जिल्ह्यात पावसाने दमदार सुरुवात केली असली, तरी पडणारा पाऊस सर्वत्र सारख्या प्रमाणात नाही. जिल्ह्याच्या अनेक भागांत पेरणीयुक्त पाऊस नसल्याने शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे कायम आहेत. काही भागांत चांगला पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी सुरू केली. िहगोलीची कयाधू नदी १० जूनला रात्री सेनगाव तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने व त्यानंतर मंगळवारी रात्री जोरदार पाऊस झाल्यामुळे कयाधू दुथडी भरून वाहिली. कयाधू नदीला पूर आल्यामुळे समग्याच्या पुलावरून पाणी वाहिले. परिणामी अनेक गावांची वाहतूक खोळंबली होती. या वर्षी आठ दिवसांत कयाधू नदी दोन वेळा दुथडी भरून वाहिली. मात्र, गेल्या वर्षभरात नदीला एकही पूर गेला नाही. पडणाऱ्या पाण्यामुळे अनेक गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. ग्रामीण भागातील पशूंनाही पिण्याच्या पाण्याची सोय झाली.