बौद्धिकदृष्टय़ा अक्षम आणि मानसिक विकलांग मुलांच्या व्यावसायिक पुनर्वसनाच्या ध्यासपूर्तीसाठी आणि बौद्धिक क्षमतांशी संबंधित विकारांवर संशोधन केंद्र सुरू करण्यासाठी पेणच्या ‘सुहित जीवन ट्रस्ट’ला आर्थिक मदतीची अपेक्षा आहे.

मानसिक विकलांग आणि बौद्धिक अक्षम मुलांना कसे सांभाळायचे, कुठे शिकवायचे, काय शिकवायचे, त्यांच्या बौद्धिक क्षमतांची मर्यादा काय या संदर्भात पालक अनभिज्ञ असतात. परंतु अशा मुलांना प्रशिक्षण देऊन स्वावलंबी करण्याचे, त्यांचे सामाजिक आणि व्यावसायिक पुनर्वसन करण्याचे काम गेल्या १६ वर्षांपासून ‘सुहित जीवन ट्रस्ट’च्या माध्यमातून केले जात आहे. बौद्धिक अक्षम मुलांवर उपचार, त्यांना प्रशिक्षण आणि त्यांचे व्यावसायिक पुनर्वसन अशा तीन पातळ्यांवर संस्थेचे काम सुरू आहे.

बौद्धिक अक्षम मुलांसाठी संस्थेतर्फे सुमंगल विद्यालय, एकलव्य व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र, लाइट हाऊस विशेष शिक्षण-प्रशिक्षण केंद्र आणि पालवी शिघ्र हस्तक्षेप केंद्र इत्यादी उपक्रम राबवले जातात. या मुलांच्या आयुष्याला जगण्याची नवी दिशा देण्याचे कार्य संस्था करत आहे.

गेली सोळा वर्षे बौद्धिकअक्षम मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी करण्याचे काम संस्था करीत आहे. या मुलांचे सामाजिक आणि  व्यावसायिक पुनर्वसन करण्याचे आव्हान संस्थेने स्वीकारले आहे.

संकल्प, उपक्रम

बौद्धिक अक्षम किंवा मानसिक विकलांग मुले जन्मालाच येऊ  नयेत, यासाठी संशोधन करण्याचा संस्थेचा मानस आहे. त्यासाठी स्वतंत्र संशोधन केंद्र उभारण्याची गरज आहे. त्याशिवाय बौद्धिक अक्षम प्रौढांचे समाज आधारित व्यावसायिक पुनर्वसन करण्याचा संस्थेचा संकल्प आहे. त्यासाठी कार्यशाळा उभारण्यात येणार आहे. शाळेच्या आवारात मुलांसाठी सुसज्ज क्रीडांगणही उभारण्यात येणार आहे. संस्थेने सोडलेले संकल्प सिद्धीस नेण्यासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता आहे.