आरमोरी पोलिसांनी गुरूवार ११ जून रोजी, कारवाई करत एका तेंदू कंत्राटदाराच्या वाहनातून १ कोटी १२ लाख रुपये जप्त केले. या घटनेमुळे तेंदूपत्ता कंत्राटदरांमध्ये खळबळ उडाली आहे.

गुरुवारी दुपारी आरमोरी पोलिस आरमोरी-देसाईगंज मार्गावरील रेशिम विकास केंद्राजवळ नाकेबंदी करीत असताना गोंदियावरुन आरमोरीमार्गे गडचिरोलीला जाणारे झायलो कंपनीचे वाहन येताना दिसले. वाहनाची तपासणी केली असता त्यात संजयकुमार किशोर टेहर(५४)रा.रेलटोली गोंदिया व स्नेहल बिपिनभाई पटेल(४५) व समीर कय्युम कुरेशी दोघेही रा.रामनगर गोंदिया हे तिघेजण होते. शिवाय वाहनात रक्कमही आढळून आली. परंतु तिघांचीही हालचाल संशयास्पद वाटल्याने व रकमेबाबत त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने गस्तीवरील पोलिसांनी सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण यांना पाचारण केले. त्यांनी वाहन जप्त करुन त्यातील व्यक्तींना पोलीस ठाण्यात नेले.

तेथे तहसीलदार, बँक व्यवस्थापक व इतर पंचांसमक्ष रक्कम मोजली असता ती १ कोटी १२ लाख रुपये एवढी असल्याचे समजले. ही रक्कम पोलिसांनी जप्त केली असून, चौकशी सुरु असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांनी दिली. आठवड्यापूर्वी सिरोंचा पोलिसांनी तेलंगणातून येणारी २ कोटीहून अधिक रक्कम जप्त केली होती, हे येथे उल्लेखनीय.