श्रीरामपूर : स्वत:च्या पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी पित्यास नेवासे येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.एस. तापकिरे यांनी वीस वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

याप्रकरणी अधिक माहिती अशी,की आरोपी पित्याने घरातील लोकांशी भांडण काढून त्यांना घरातून कोणत्या ना कोणत्या कामासाठी बाहेर पाठवून दिले. स्वत:च्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले. या मुलीच्या आईचा मुलीच्या लहानपणीच मृत्यू झालेला होता. वडिलांनी केलेल्या अत्याचाराबाबत भीतीपोटी तिने कुणालाही सांगितले नव्हते. परंतु तिच्या आजीला हा प्रकार तिने सांगितला. आजीने नेवासे पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध फिर्याद दिली होती. पोलीस उपनिरीक्षक जी.टी. वाबळे यांनी या गुन्ह्यचा तपास करुन न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.एस.तापकिरे यांच्यापुढे झाली. न्यायालयाने आरोपीला लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा कलम ५ व ६ अन्वये वीस वर्ष सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा, तसेच कलम ७ व ८ अन्वये तीन वर्ष सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा, तसेच मारहाण प्रकरणी तीन महिने सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा, जिवे मारण्याच्या धमकी प्रकरणी सहा महिने सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

अशा घटनांचा समाजमनावर विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळे दोषी सिद्ध होत असलेल्या अशा घटनांमधील आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा होणे आवश्यक आहे. म्हणून आरोपीला शिक्षेबाबत कुठल्याही प्रकारची सहानुभूती दाखविता येणार नाही, असे जिल्हा व सत्र न्यायाधीश तापकिरे यांनी निकालपत्रात म्हटले आहे. या खटल्यात सरकारच्यावतीने सरकारी वकील मयुरेश नवले यांनी काम पाहिले. त्याना सरकारी वकील एम.पी. नवले, पैरवी अधिकारी सुभाष हजारे, मुस्तफा शेख, अनिल जाधव, सुहास बटुळे, गणेश चव्हाण या पोलीस कर्मचाऱ्यांनी मदत केली.