गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी चांगला पाऊस झाल्याने पश्चिम वऱ्हाडातील अकोला, वाशिम व बुलढाणा जिल्ह्य़ात पिकांची समाधानकारक स्थिती आहे. या भागात यंदाही सोयाबीन व कापूस पिकाचा सर्वाधिक पेरणा आहे. गेल्या एक महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने पिकांवर त्याचे दुष्परिणाम होत आहे. परतीचा दमदार पाऊस न आल्यास उत्पादनात घट होण्याची शक्यता कृषी उपसंचालक शांताराम मालपुरे यांनी वर्तविली आहे. बुधवारी काही ठिकाणी पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे.

यावर्षी वेळेवर पावसाचे आगमन झाल्याने पेरण्यांना तो अत्यंत पोषक ठरला. जुलै-ऑगस्टमध्येच पावसाने सरासरी गाठली. काही ठिकाणी आतापर्यंत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. या जिल्ह्य़ात ४ लाख ८३ हजार ८८० हेक्टरच्या पेरणीचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी ४ लाख ६० हजार ७५५ हेक्टरवर ९५ टक्के पेरणी झाली. सोयाबीन २ लाख १२ हजार ८७७ हेक्टर, कापूस १ लाख ०१ हजार ९३३ हेक्टर, तूर ६१ हजार १० हेक्टर, या प्रमुख पिकांसह ज्वारी, मका, मुंग, उडीद, भुईमूग, तीळ, सुर्यफूल, उस आदी पिकांचीही पेरणी करण्यात आली. सुरुवातीला चांगल्या पावसामुळे पिकांची वाढही जोमदार झाली. मात्र, गेल्या काही आठवडय़ांपासून दडी मारल्याने सोयाबीनच्या शेंगातील दाणे भरलेले नाही. मागील तीन, चार वर्षांनंतर यावर्षी सोयाबीन पीक जोमदार वाढल्याने शेतकऱ्यांना आशा पल्लवित झाल्या आहेत. मान्सूनपूर्व बीटी कापसाने बोंडय़ा धरल्या असून फुले आली आहेत. यावर्षी कापसाचे पीक उत्तम असल्याने शेतकऱ्यांना मोठय़ा अपेक्षा आहेत. मात्र, सर्वच पिकांसाठी आता परतीच्या दमदार पावसासाठी शेतकऱ्यांचे डोळे नभाकडे लागले आहेत.

वाशिम जिल्ह्य़ात यंदा चार लाखांहून अधिक हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली. त्यात सोयाबीन, कापूस, ज्वारी, उडीद, तूर, मूग, उडीद, हळद आदी पिकांचा समावेश असून, सर्वाधिक पेरा पुन्हा एकदा सोयाबीनचाच आहे. जिल्ह्य़ात यंदा २ लाख ८८ हजार ६३२ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली. जिल्ह्य़ात सुरुवातीलाच दमदार पाऊस झाल्याने पेरणी जुलैच्या पूर्वार्धातच आटोपली. त्यानंतरच्या पावसामुळे पिकांची स्थिती उत्तम झाल्याचे चित्र आहे. ऑगस्टमध्ये पीक परिस्थिती चांगली असतांना पावसाने दडी मारल्याने पिके सुकू लागली होती. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा पाऊस पडायला सुरुवात झाली. काही ठिकाणी तुरळक तर, काही ठिकाणी दमदार पाऊस पडत आहे. यावर्षी सुरुवातीपासून समाधानकारक पाऊस झाल्याने पीक परिस्थिती चांगली आहे.

बुलढाणा जिल्ह्य़ात खरीप हंगामाचे ७ लाख ८४ हजार २२२ सरासरी क्षेत्र आहे. ९० टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यात सर्वाधिक ३ लाख २२ हजार ७४४ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन व त्यानंतर कापूस, तूर ६५ हजार ८९३, मूग १७ हजार ५३१, उडीद १५ हजार २१३, मका १६ हजार ३०९ व इतर पिकांची पेरणी करण्यात आली. यंदा जिल्ह्य़ात पावसाला उशिरा सुरुवात झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी या पिकाकडे पाठ फिरवली. त्यामुळे यंदा मूग व उडदाचे क्षेत्र मोठय़ा प्रमाणावर घटले आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांनी अन्य पिके घेण्यास पसंती दर्शवली आहे. त्यानंतर चांगला पाऊस झाल्याने सध्या जिल्ह्य़ात पिकांची समाधानकारक स्थिती आहे. मधल्या काही काळात पावसाने दडी मारल्याने पिकांवर त्याचे दुष्परिणाम दिसून आले. आता परतीच्या पावसाने साथ दिली, तर चांगले उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडू शकते. यावर्षी पिकांची समाधानकारक स्थिती असल्याने बाजारपेठेतील उलाढालीत मोठय़ा प्रमाणात वाढ होण्याची शक्यता व्यावसायिकांडून व्यक्त केली जात आहे.