देशभरात १ जुलपासून लागू झालेल्या वस्तू व सेवाकर अर्थात जीएसटीची गणेशमुर्तीकारांना धास्ती वाटत आहे. यावर्षी गणेशमुर्तीवर जीएसटीचा फारसा परिणाम दिसणार नसला तरी पुढील वर्षांपासून याचा मोठा परिणाम दिसून येण्याची भीती मुर्तिकारांना वाटते आहे.

पेणमध्ये १२ महिने गणेशमुर्ती बनवण्याचे काम सुरु असते. यातील आठ महिने मुर्ती बनवण्याचे तर शेवटचे चार महिने मुर्ती रंगवण्याचे काम केले जाते. मुर्तीकामासाठी लागणाऱ्या कच्या मालाची खरेदी साधारणपण सप्टेंबर ते जानेवारी महिन्यात केली जाते तर रंगकामाच्या साहित्याची खरेदी एप्रिल महिन्यापासून सुरु होते. त्यामुळे यावर्षी गणेशमुर्तीवर वस्तु व सेवाकराचा फारसा परिणाम दिसून येणार नाही, पण पुढील वर्षी मुर्तीकारांना कच्च्या मालावर जीएसटी भरावा लागणार आहे. याचा मोठा मोठा परिणाम दिसून येण्याची शक्यता मुर्तीकार व्यक्त करीत आहेत.

गणेशमुर्तीवर नेमका किती जीएसटी लागेल याबाबत मुर्तीकारांना अद्याप प्रशासनाकडून कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे जीएसटीची आकारणी कशी करावी, त्याचे विवरण पत्र कसे भरावे, यांची अनेक गणेशमुर्ती कार्यशाळांना धास्ती वाटत आहे. मात्र सध्यातरी मुर्तीकारांनी गणेशमुर्तीची कामे उरकण्यावर भर दिला आहे.

यापुर्वी पुजेतील मातीच्या गणेशमुर्तीना विक्रीकरातून राज्यसरकार सुट देत होते. आता मात्र गणेशमुर्तीवर जीएसटी कर आकारला जाणार आहे. गणेश मुर्तीव्यवसाय हा पुर्णपणे हस्तकलेवर आधारीत कुटीर उद्योग आहे. पेण परिसरातील घराघरात लहानमोठय़ा प्रमाणात हा उद्योग केला जातो आहे. यातून मोठी रोजगार निर्मिती होत आहे. त्यामुळे शासनाने गणेशमुर्तींना वस्तु व सेवाकरातून सुट द्यावी. अशी मागणी पेण येथील गणेश मुर्तीकार संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत देवधर यांनी केली आहे.

दरवर्षी कच्च्या मालाच्या किमती, कारागिरांच्या मजुरीत साधारणपणे १० ते १५ टक्के वाढ होते. त्यामुळे गणेशमुर्तीच्या किमतीदेखील १० ते १५ टक्क्यांनी वाढतात.

यावर्षी देखील तेवढीच वाढ झाली आहे. हा जीएसटीचा परिणाम आहे. असे म्हणता येणार नाही असेही देवधर यांनी स्पष्ट केले.

गणेशोत्सवानंतर मुर्तीकार मुख्यमंत्र्यांना भेटणार

‘जीएसटीबाबत असलेला संभ्रम दूर व्हावा आणि विक्रीकराप्रमाणे पुजेतील लहान गणेश मुर्तीवर वस्तु व सेवा करातून सुट मिळावी. या मागणीसाठी पेण येथील गणेश मुर्तीकारांचे एक शिष्टमंडळ गणेशोत्सवानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.’ श्रीकांत देवधर, अध्यक्ष पेण गणेश मुर्तीकार संघटना.